Dhule News | लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजवावा : जिल्हाधिकारी गोयल | पुढारी

Dhule News | लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजवावा : जिल्हाधिकारी गोयल

धुळे;पुढारी वृत्तसेवा- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले.

14 राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साक्री येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी गोयल बोलत होते. या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणुक अधिकरी अरविंद अंतुर्लीकर, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, अपर तहसिलदार दत्तात्रय शेजुळ, नायब तहसिलदार राजेंद्र सोनवणे, सि.गो.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, विद्या विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.एल.तोरवणे, तृतीय पंथीयाचे प्रतिनिधी पार्वतीबाई, दिव्यांग संघटक गिरीलाल साळुंखे यांच्यासह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, नव मतदार, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, सन 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हाच की, आपले जेवढे मतदार आहेत त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क हमखास बजावला पाहिजे जेणेकरुन मतदारांच्या अधिकाराची अंमलबजावणी होवू शकेल. यावर्षीच्या 14 व्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी “मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही” अशी थिम आयोगाने दिलेली आहे. समाजातील सर्व नागरिकांचा निवडणूक संबंधित प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवून त्यांना प्रोत्साहित करुन मतदार नोंदणी आणि मतदानाकरीता सुलभता निर्माण करणे आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांना सहभाग नोंदविण्याच्या उद्देशाने सदर थिम देण्यात आलेली आहे.

आपण नुकताच भारतीय स्वांतत्र्याच अमृत महोत्सव साजरा केला आहे. आपल्या देशात निवडणूका भयमुक्त वातावरणात होतात. भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाचे काम अतिशय अभूतपूर्व व अतुलनीय असून भारतासाठी निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. विशेष करुन नव मतदारांनी आगामी निवडणुकीत हमखास मतदान करावे. भारत निवडणूक आयोगाने आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी व्होटर हेल्प ॲप ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक असल्याने आपण आपले नाव नोंदणी करुन घ्यावे. नुकतीच 23 तारखेला जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे, ज्यांच्या नावात दुरुस्ती असेल त्यांनी ती करुन घ्यावी. हे निवडणूकीचे वर्ष असल्याने आपली सर्वांची जबाबदारी आहे की, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. प्रत्येक मतदारांनी आपले मत नोंदवावयाचे आहे. त्यासाठी जनजागृती मोहिम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. यात युवकांनीही शाळा, महाविद्यालय व आपल्या परिसरात मतदान जनजागृतीसाठी काम करुन प्रोत्साहित करावे. ईएलसी मतदार साक्षरता क्लॅबची स्थापना करुन शिक्षक, विद्यार्थी, एनएससीच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालय व गावस्तरावर जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना यावर्षी भारत निवडणूक आयोगाने होम व्होटींगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी मुंडावरे म्हणाले की, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून 25 जानेवारी 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. प्रत्येकाने वेळोवेळी मतदान करावे, विशेषत: नवमतदारांनी अधिक प्रमाणात नाव नोंदणी करावी. योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण सर्वांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंतुर्लीकर म्हणाले की, मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन केले जाते. आजच्या दिवशी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशात भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले मतदार, दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची तपासणी करावी. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल व्हीएसपी किंवा वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून नाव नोंदणी, नावात बदल, पत्त्यात बदल करु शकतात असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार साहेबराव सोनवणे, प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विजेत्यांचा गौरव

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निबंध, रांगोळी, घोषवाक्य, भित्तीपत्रक आदी स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेतील विजेत्यांसह मतदार नोंदणीत उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नवमतदारांना ई-पीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सामुहिक प्रतिज्ञापत्राचे वाचन केले. शाहीर सुभाष कुलकर्णी यांनी मतदार गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button