शिर्डीसह नगरही आम्हालाच हवे : आमदार सुनील शिंदे | पुढारी

शिर्डीसह नगरही आम्हालाच हवे : आमदार सुनील शिंदे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभेच्या पारनेर, अहमदनगर मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी झालेली नाही. दोन्ही मतदारसंघात कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळे लोकसभेची शिर्डीची जागा आमचीच आहे. त्याबरोबर आम्ही नगर दक्षिणेची जागा लढविण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे, असे सांगून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी नगर दक्षिण मतदारसंघावर दावा सांगितला. शिवसेना नेते संजय राऊत येत्या रविवारी नगरमध्ये शहरामध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्या उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, अनिल बोरूडे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, आमदार शिंदे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागनिहाय शिवसेना उपनेत्यांवर जबाबदारी दिली आहे. त्यात संजय राऊत यांच्यावर उत्तर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यतंरीच्या काळात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय अभाव दिसून येत होता. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये समन्वय होईल. लोकसभा व विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात येणार आहे. विधानसभेच्या ज्या मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद असेल कार्यकर्ते सक्रिय असतील त्या मतदारसंघाची निवडणुकीसाठी चाचपणी करीत आहोत. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते अद्याप नाशिकमध्ये आहेत. ते आल्यानंतर सक्रिय होतील.

रविवारी नगरमध्ये मेळावा
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 28) रोजी नगरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यानंतर शिवसैनिकांना ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजय राऊत होय. येत्या रविवारी नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देण्यासाठी राऊत नगरमध्ये येणार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा असून, त्यात संजय राऊत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

नगरसाठी 3 तगडे उमेदवार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविणे हा वरिष्ठ पातळीचा निर्णय आहे. परंतु, उद्या होणार्‍या मेळाव्यात दुसर्‍या पक्षातील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यात अनेक वजदार नेते पक्षात दिसतील. नगर लोकसभेसाठी आमच्या तीन तगडे उमेदवार आहेत, असेही शिंदे म्हणाले.

Back to top button