Sangli News : खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश | पुढारी

Sangli News : खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

विटा : पुढारी वृत्तसेवा: खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली आहे. Sangli News

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील अधिसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज (दि.२) मुंबईत जाऊन वैभव पाटील यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे झाले. तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल. शिवाय खानापूरसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांना स्पष्ट करून सांगितले. Sangli News

यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्या आणि खानापूर या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्र करण्यासंदर्भात कार्यवाही करा, असे आदेश दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली आहे. तसेच पाटील म्हणाले, खानापूरमध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे. गावातून महामार्ग गेला आहे. लगतच ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. शिवाय पाणीही उपलब्ध आहे. त्यामुळे या उपकेंद्राला मान्यता मिळाल्यास दुष्काळी भागाचा कायापालट होणार आहे.

तसेच विद्यार्थी, शैक्षणिक संकुल, पालक आणि संशोधक यांना फायदा होणार आहे. रोजगारही उपलब्ध होणार आहे. म्हणूनच त्यासाठी आवश्यक पूर्तता करून घेण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री पवार यांची खास भेट घेतली, असेही पाटील यांनी सांगितले. यावेळी अविनाश चोथे, राजेंद्र मोहिते, सचिन शिंदे आणि सांगली जिल्ह्यातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button