कोल्‍हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या ऊस तोडणीविरोधात सतेज पाटील यांचा मोर्चा | पुढारी

कोल्‍हापूर : राजाराम साखर कारखान्याच्या ऊस तोडणीविरोधात सतेज पाटील यांचा मोर्चा

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी व ऊस नोंदी घेणेकामी अन्याय होत असल्‍याच्या कारणावरून आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, यांच्या कार्यालयावर काढण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या ऊस तोडणी व नोंदी बाबत कारखान्याला तात्काळ कळविण्यात येईल असे आश्वासन प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी दिले. आठ दिवसात याबाबत निर्णय झाला नाही तर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसह स्वतः कारखान्याच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. कारखान्याची निवडणूक होऊन सहा महिने झाले. सत्तारुढ संचालक मंडळाने विरोधात मतदान केलेल्या पाच ते सहा हजार सभासदांना जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने ऊसाला तोडणी दिलेल्या नाहीत. शेती ऑफिस मधील कर्मचारीही ठोस माहिती देत नसून, आम्हाला वरून आदेश आहेत असे मोगमपणे सांगून ज्यादा माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते. शेती विभागाच्या सर्कल ऑफिसमध्ये ऊस नोंदी ठेवलेल्या विरोधी गटाच्या सभासदांच्या नावापुढे विरोधक स्पष्ट नोंद केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कारखाना प्रशासन ऊस नेत नसल्यामुळे सभासद विवंचनेमुळे दबावाखाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुढील वर्षाच्या गळीत हंगामासाठी ज्या सभासदांनी ऊस पिकाच्या आडसाली /पूर्व हंगामी लागणी केल्या आहेत तसेच जे सभासद सुरू हंगामातील लागणी करत आहेत, त्यांच्या लागणी कारखाना प्रशासनाकडून नोंद करून घेतल्या जात नाहीत. याबाबत कारखाना प्रशासनास सक्त सूचना देऊन सर्व सभासदांना ऊस वेळेवर तोडणी करून गाळपास नेणे बाबत तसेच पुढील हंगामातील उसाच्या नोंदी घेणे बाबत आदेश देण्यात यावेत. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे प्रादेशिक सहसंचालक साखर यांना देण्यात आला आहे. निवेदनावर ऊस उत्पादक सभासदांच्या सह्या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button