वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमीतीची बैठक होणार आहे. या बैठकीला आज (मंगळवार) दुपारी चार वाजता अंतरवाली सराटितून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे व्हिसीद्वारे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी आज संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणावर आज चार मॅरेथॉन बैठका होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात आज पूर्ण दिवस बैठका होत आहेत. दुपारी ४ वाजता व्हिसीद्वारे मुख्यमंत्री जरांगे यांच्यात संवाद होणार आहे.
मराठा आरक्षण विषयासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरू असलेली कार्यवाही व एकूणच मराठा आरक्षण विषयाशी संबंधीत सर्व विषय व कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक २ जानेवारी मंगळवार रोजी दुपारी ४ वाजता मुंबई येथे आयोजित केलेली आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मुंबई येथे होत असलेल्या बैठकीला मनोज जरांगे यांनी उपस्थित राहावे याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी विनंती पत्र पाठवले होते. मात्र आपण बैठकीला जाणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र आज व्हिसी द्वारे बैठकीला हजर राहणार. याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी चार भिंती आड कोणत्याही बैठकीला हजर राहणार नाही. या भूमिकेतून तो निर्णय घेतला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः संपर्क साधला. आजच्या होणाऱ्या बैठकीला व्हिसीद्वारे उपस्थित रहा. मी सर्व समाजापुढे बोलत असतो, आपली भूमिका मांडत असतो. त्यामुळे आज या व्यासपीठावरून व्हिसीद्वारे मी सर्व समाजासमोर सरकारशी बोलणार आहे. त्यामुळे माझा समाज हा माझ्याशी महत्त्वाचा आहे. त्या समाजाशी मी गद्दारी करू शकत नाही असे ते यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे हे व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षणा संदर्भात आपल्या मागण्या व भूमिका, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडावयाची आपली मते, या बैठकीत सहभागी होऊन भूमिका मांडतात की, इतर मुद्द्यावर चर्चा होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :