पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीरोजी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तीन मूर्त्यांपैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. ही मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. Ayodhya Ram Mandir
प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर लिहिले आहे की, 'जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे. राम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याचे हे प्रतिक आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील अरुण यांनी रामललाची मूर्ती साकारणे ही एक महत्त्वाची सेवा आहे. Ayodhya Ram Mandir
राम लल्लाच्या अचल मूर्तीच्या निर्मितीसाठी ट्रस्टने नेपाळच्या गंडकी नदीसह कर्नाटक, राजस्थान आणि ओरिसा येथून १२ प्रकारचे उच्च दर्जाचे दगड आणले होते. या सर्व दगडांची चाचणी केली असता केवळ राजस्थान आणि कर्नाटकातील खडकच मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचे आढळले. त्यामुळेच या खडकांची निवड करण्यात आली.
कर्नाटकातील श्याम शिला आणि राजस्थानच्या मकराना येथील संगमरवरी खडक त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे निवडले गेले. मकराना दगड अतिशय कठीण आणि कोरीव कामासाठी उत्तम आहे. त्याची चमक शतकानुशतके टिकते. त्याचबरोबर कर्नाटकातील श्याम शिलेवर कोरीव काम सहज केले जाते. हे खडक पाणी प्रतिरोधक आहेत आणि त्यांचे आयुष्य जास्त आहे.
मूर्तीची एकूण उंची ५२ इंच असावी
श्रीरामाचे हात गुडघ्याइतके लांब असावेत.
डोके सुंदर, डोळे मोठे आणि कपाळ भव्य असावे.
कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती
हातात धनुष्य आणि बाण
पाच वर्षांच्या मुलाची बालसदृश कोमलता पुतळ्यातून दिसून येते.
योगीराज हे सर्वपरिचित नाव असून सोशल मीडियावर त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे ३७ वर्षीय अरुण योगीराज पूत्र आहेत. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. अरुणच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे. एमबीएचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु, २००८ मध्ये शिल्पकार बनण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.
महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे बनवले.
केदारनाथ येथे स्थापित आदी शंकराचार्यांचा पुतळा तयार करण्याबरोबरच, योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा तयार केला आहे. महाराजा श्री कृष्णराजा वाडेयर-चतुर्थ आणि म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा संगमरवरी पुतळाही त्यांनी तयार केला आहे. अरुण यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा साकारला आहे.
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी शिल्पकार अरुण योगीराज यांनी कोरलेल्या मूर्तींच्या निवडीबद्दल योगीराज यांची आई सरस्वती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्यासाठी हा सर्वात आनंदाचा क्षण आहे, मला ते शिल्प साकारताना पाहायचे होते, पण मी प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. माझ्या मुलाची प्रगती आणि त्याचे यश पाहून मला आनंद झाला आहे. त्याचे यश पाहण्यासाठी त्याचे वडील उपस्थित नाहीत, माझा मुलगा अयोध्येला जाऊन ६ महिने झाले आहेत.
हेही वाचा