Kalyan IMathon: कल्याण येथील आयमेथॉनमध्ये धावले ५ हजार धावपटू | पुढारी

Kalyan IMathon: कल्याण येथील आयमेथॉनमध्ये धावले ५ हजार धावपटू

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  अवघ्या काही वर्षांतच देशभरातील धावपटूंमध्ये आपला नवलौकिक मिळविलेल्या कल्याणच्या आयमेथॉन 4 मध्ये यंदा रेकॉर्डब्रेक 5 हजार धावपटू सहभागी झाले होते. ज्यामध्ये कल्याण-डोंबिवलीसह ठाणे, मुंबई आणि देशाच्या विविध राज्यांतील धावपटूंसह विदेशातील धावपटूंचाही समावेश होता. विशेष म्हणजे या स्पर्धेतून मिळालेले सर्व उत्पन्न समाजातील वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या सजग चॅरिटेबल ट्रस्टला देण्यात आले. Kalyan IMathon

कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रमुख संजय जाधव, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सजग संस्थेच्या सजिता लिमये यांनी ही आर्थिक मदत स्विकारली. Kalyan IMathon

रविवारी सकाळी दुर्गाडी चौकाजवळ असलेल्या रिंगरोड परिसरातून मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत देशातील दर्जेदार अर्धमॅरेथॉन स्पर्धा असा नावलौकिक प्राप्त केलेल्या कल्याणच्या आयमेथॉनमध्ये 5 हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महिलांसह लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अश्विन कक्कर यांनी विशेष मेहनत घेतली. ज्याला आयएमए कल्याणच्या उपाध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, सचिव डॉ. विकास सूरंजे, वरिष्ठ सदस्य डॉ. अश्विन कक्कर, डॉ. राजेश राघव राजू, डॉ. अमित बोटकुंडले यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील, सचिन सालीयन यांच्यासह सर्व टीमकडून मोलाची साथ लाभली.

या स्पर्धेसाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे,  मुंबई, दिल्ली, आसाम, हरियाणा, पंजाब, केरळसह केनियातील काही आंतरराष्ट्रीय धावपटू सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कल्याण-डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच दरम्यान केडीएमसीच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आपल्या टीमसह ऊर्जा संवर्धनाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा 

Back to top button