ठाणे: महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून मंगळसूत्र चोरणारा जेरबंद | पुढारी

ठाणे: महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून मंगळसूत्र चोरणारा जेरबंद

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा : कल्याण जवळच्या होमबाबा टेकडीवर असलेल्या दर्ग्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून तिचे मंगळसूत्र हिसकावून लुटारू पसार झाला होता. ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटारूचा शोध सुरू केला होता. दोन महिन्यांनंतर अमीर मलंग शेख (वय 29, रा. हनुमान नगर/संतोष नगर, होमबाबा टेकडी, कल्याण-पश्चिम) याच्या बदलापूरजवळच्या वांगणीत सापळा लावून टिळकनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी ही महिला 6 ऑक्टोबररोजी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडीवर असलेल्या दर्ग्याच्या दिशेने चालली होती. दर्ग्याच्या आसपास प्रचंड गवतातून मार्ग काढत जात असताना एका बदमाश्याने त्या महिलेला हटकले.

त्याने या महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरु केला. जोरदार प्रतिकार करत महिलेने आरडाओरडा सुरू केला. कशीबशी तिने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. मात्र नराधमाने या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. तेथील भाजपचे कार्यकर्ते संतोष चौधरी यांनी पीडित महिलेला धीर देऊन श्रीकृष्णनगर पोलीस चौकीत नेले. त्यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार लुटारूचा शोध सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक भूमिगत झालेल्या बदमाशाचा माग काढण्यात यशस्वी झाले. हा बदमाश अमीर शेख असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला हुडकून काढण्यासाठी पथक त्याच्या मागावर रवाना झाले. तब्बल दोन महिन्यांपासून आमीर शेख पोलिसांना चकवा देत होता. काही दिवस तो अजमेरमध्ये लपून बसला होता. पोलिसांचे पथक अजेमरला गेले. मात्र, तेथून अमीर निसटला. हाच बदमाश बदलापूरजवळच्या वांगणीत येणार असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले. अमीर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने अशा पद्धतीने अन्य काही गुन्हे केले आहेत का ? याचा चौकस तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button