सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : विद्यमान मंत्र्यांची अग्निपरीक्षा; माजी मंत्र्यांचीही सत्वपरीक्षा | पुढारी

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : विद्यमान मंत्र्यांची अग्निपरीक्षा; माजी मंत्र्यांचीही सत्वपरीक्षा

सातारा : हरीष पाटणे

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित 10 जागांसाठी दि. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. राज्याचे सहकारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा घेऊन आली आहे. तर सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठीही ही निवडणूक सत्वपरीक्षा ठरणार आहे.

तिन्ही दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत ‘घामटा’ निघत आहे. विद्यमान मंत्री व माजी मंत्री निवडून आले तर त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावरील आपली असलेली ‘कमांड’ कायम राहील. मात्र, पराभव झाला तर राजकीय कमांडला धक्का लागेलच, शिवाय भविष्यातील सातारा जिल्ह्याच्या राजकारणाची सत्ता समीकरणेही बदलून जातील.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे ना. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलची सत्ता जिल्हा बँकेवर आली आहे. मात्र, उर्वरित 10 जागांसाठी त्या-त्या मतदार संघात हायव्होल्टेज लढती होणार आहेत.

ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्याच्या सहकाराची निवडणूक प्रक्रिया सुरू असते ते राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कराड सोसायटी मतदारसंघात माजी सहकार मंत्री व एकेकाळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ज्यांनी एक खांबी नेतृत्व केले ते स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील यांच्याविरोधात लढावे लागत आहे.

ही झुंज अटीतटीची झाली आहे. दोन्ही बाजूने आपल्याकडे बहुमताएवढी बेरीज असल्याचे सांगितले जात आहे. सहकारमंत्री व पालकमंत्री म्हणून ना. बाळासाहेब पाटील यांच्यासाठी सोसायटी मतदार संघातील ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली आहे.

बाळासाहेब पाटील यांचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघावर व कराड तालुक्याच्या राजकारणावर प्राबल्य आहेच. त्याचबरोबरीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही बाळासाहेबांची ‘कमांड’ मजबूत झाली आहे. यापूर्वी अनेकदा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुढच्या दाराने येण्याचे त्यांचे दरवाजे बंद केले गेले होते.

या खेपेलाही त्यांना लढाई तशी सोपी नाही. त्यांच्या दुर्दैवाने पराभव झाला तर सहकार मंत्र्यांचा पराभव म्हणून फार मोठ्या नाचक्कीला त्यांना सामोरे जावे लागेल. निवडून आले तर कराडच्या सहकार क्षेत्रासह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भविष्यकालीन राजकारणावरही बाळासाहेबांचा पगडा राहील. त्यामुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत कराड सोसायटीची ही निवडणूक कुठल्या थराला जाते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाटण सोसायटी मतदार संघात गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांची माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह यांच्याशी लढाई होत आहे. सहकार क्षेत्रात पाटणकरांचा पूर्वीपासूनच दबदबा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत शंभूराज असावेत, अशी दस्तुरखुद्द अजितदादांचीच इच्छा होती.

मात्र, जिल्ह्याच्या राष्ट्रवादीने शंभूराजना टांग मारली. पर्यायाने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. पाटणच्या राजकारणावर कमांड असलेल्या देसाईंसाठी सोसायटीतली निवडणूक प्रतिष्ठेची आहे. संपूर्ण जिल्ह्यात आपल्या सायरनने आवाज निर्माण केलेल्या शंभूराज यांच्यासाठी सोसायटीत विजयी होणे भविष्यकालीन राजकारणासाठी आवश्यक ठरणार आहे.

यदाकदाचित सत्यजितसिंहांनी देसाईंना आस्मान दाखवले तर गृहराज्यमंत्र्यांना ते शल्य कायम बोचत राहील आणि जिल्ह्याच्या राजकारणावर वाढलेल्या त्यांच्या कमांडलाही धक्का बसेल. विद्यमान मंत्री म्हणून ना. बाळासाहेब पाटील व ना. शंभूराज देसाई यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुढच्या दाराने एन्ट्री करताना घामटा निघत आहे हे मात्र नक्की. उदयसिंह व सत्यजितसिंह यांना वेगवेगळ्या ठिकाणी पराभवाचा अनुभव आहे. मात्र, ते निवडून आले तर दिग्गजांचा पराभव केला म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण होणार आहे.

सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे राज्याचे प्रवक्ते आ. शशिकांत शिंदे यांनाही जावली सोसायटी मतदार संघात टफ फाईट आहे. आ. शिवेंद्रराजेंचे समर्थक ज्ञानदेव रांजणे हे वसंतराव मानकुमरे यांच्या सहकार्याने मतदारांना घेवून सहलीवर गेल्याने आ. शशिकांत शिंदे यांची विजयापर्यंतची बेरीज अद्यापही जुळलेली नाही. एका बाजूने ज्यांनी फसविले त्यांच्याच व्यासपीठावर अजूनही आ. शशिकांत शिंंदे मांडीला मांडी लावून बसत आहेत आणि दुसरीकडे मतदार मात्र सहलीवर मौजमजा करत आहेत.

आ. शिवेंद्रराजेंनी कराडमध्ये जावलीचे दोन दिवसांत मिटेल असे म्हटले आहे. मात्र, रांजणे यांचे मतदार आता त्यांच्या तरी हातात राहिले आहेत का? हे शिवेंद्रराजेही सांगू शकत नाहीत आणि रांजणेही सांगू शकत नाहीत. वसंतराव मानकुमरे यांनी लढवलेली शक्कल संपूर्ण पॅनलच्याच अंगलट आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी शशिकांत शिंदे निवडून आले पाहिजेत, असे आदेश दिल्याचे समजते.

अशा परिस्थितीत सहलीवरच्या मतदारांनी शिंदेंविरोधात निर्णय घेतला तर माजी पालकमंत्र्यांनाही गाफीलपणा चांगलाच अंगलट येणार आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी कोणावरही विश्वास न ठेवता उरलेल्या दोन दिवसांत स्वत:ची यंत्रणा स्वत: राबवून हालचाली केल्या तर ‘पाखरं’ त्यांच्या हातात येऊ शकतात आणि संभाव्य घडामोडींपासून ते सुरक्षितही राहू शकतात. त्यासाठीच पुढचे दोन दिवस त्यांच्यासाठी सत्व परीक्षा आहे. या तीन दिग्गजांचे विजय अथवा पराभव सातारा जिल्ह्याच्या भविष्यकालीन राजकारणाच्या सत्तासमीकरणांवर परिणाम करणारे ठरणार आहेत.

माण सोसायटी मतदार संघात शेखर गोरे विरुद्ध मनोज पोळ अशी लढत आहे. आ. जयकुमार गोरे व अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्यांचे मतदान कोणाला होणार यावर निकाल अवलंबून आहे. कोरेगाव सोसायटी मतदार संघात आ. शशिकांत शिंदे यांचे समर्थक शिवाजीराव महाडिक व आ. महेश शिंदे यांचे समर्थक सुनील खत्री यांच्यात जरी लढाई असली तरी या लढाईने आता दोन आमदारांमधील लढाईचे स्वरुप धारण केले आहे. खटाव सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादीने नंदकुमार मोरे यांना उमेदवारी दिली असली तरी प्रभाकर घार्गे यांनी बंडखोरी केल्याने अटीतटीची लढाई होत आहे.

इतर मागास प्रवर्गात प्रदीप विधाते यांच्या विरोधात शेखर गोरे लढत असले तरी शेखर गोरे यांनी सोसायटी मतदार संघावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. नागरी बँका-पतसंस्था मतदार संघात रामभाऊ लेंभे व सुनील जाधव यांच्यात होणारी लढत एकतर्फीच होण्याची शक्यता आहे.

महिला राखीव मतदार संघात कांचन साळुंखे व ऋतुजा पाटील- वाठारकर यांच्याविरोधात शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर या लढाईत निकाल धक्कादायकही लागू शकतो. 10 मतदार संघातील लढतींपैकी तीन लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या असल्याने त्याकडे राज्याचे लक्ष आहे. विद्यमान मंत्र्यांची अग्नि परीक्षा व माजी मंत्र्यांची सत्वपरीक्षा अशीच ही लढाई आहे.

मतदार नाहीत समोर, मग मेळावे कसले घेताय?

अनेक सोसायटी मतदार संघांमधील मतदार ‘लंपास’ केले आहेत. कुणी बिदागी देऊन, कुणी लालूच दाखवून, कुणी ठरवून तर कुणी करेक्ट कार्यक्रम करायचा म्हणून मतदार राजाची चांदी सुरू ठेवली आहे. अनेक मतदारच जागेवर नसताना जिल्ह्यात मेळाव्यांचा मात्र सपाटा लावला आहे. त्यामध्ये सोसायट्यांचे बहुतांश मतदारच नाहीत. नागरी बँका, ओबीसी मतदारसंघ, महिला राखीव या मतदार संघातील मतदार असले तरी हे

मतदार अशा मेळाव्यांना किती उपस्थित राहतात, हे शोधण्यासाठी सुक्ष्मदर्शिकाच लावावी लागेल. मग अनेक मतदारच समोर नसताना भाषणे देवून ‘उकर्‍या’ का काढत आहात? मेळाव्याला येणारे-जाणारे दर जत्रेत खंगळून निघणार्‍यांपैकी आहेत. त्यांच्यासाठीच ही करमणूक चालवली आहे की काय? असेच चित्र दिसत आहे. मतदार समोर नसताना मेळावे घेवून होत असलेली ही इतिहासातील पहिलीच निवडणूक आहे की काय? असा भाबडा सवाल सहलीवर गेलेले मतदार विचारत आहेत. मेळाव्यांना तर आम्ही नसतो मग ‘आमचं मतदान होणार आहे ना?’ असाही त्यांचा सवाल आहे.

Back to top button