Nashik Chain Snatching : सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी ; दोघे गजाआड | पुढारी

Nashik Chain Snatching : सोनसाखळी चोरांना नडला दुचाकीस्वार, दुचाकी समोर-दुचाकी केली आडवी ; दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानतेमुळे पकडता आले. दुचाकीस्वार किरण शिवाजी ताडगे यांनी त्यांच्या दुचाकीने चोरट्यांच्या दुचाकीस अडवून खाली पाडले. त्यानंतर नागरिकांनी एकाला आणि पळून गेलेल्या संशयितास गंगापूर पोलिसांनी पकडले. (Nashik Chain Snatching)

मयूर बसंत गायकवाड (रा. धर्माजी कॉलनी) व पप्पू चंद्रबली चव्हाण (रा. श्रमिकनगर, सातपूर) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आकाशवाणी टॉवर परिसरातील भाजी मार्केट येथून माधुरी गणेश जाधव या पायी जात होत्या. त्यावेळी बुलेटस्वार दोन चोरट्यांनी माधुरी यांच्या गळ्यातील पोत खेचून नेली. माधुरी यांनी आरडाओरड केल्याचे मखमलाबाद येथील रहिवासी किरण ताडगे यांनी ऐकले. त्यांनी प्रसंगावधान राखत चोरट्यांचा पाठलाग करीत त्यांच्या दुचाकीस अडवून दोघांना खाली पाडले. तेथे गर्दी जमल्याने एक संशयित फरार झाला, तर एकाला किरण यांनी पकडले. अपघात झाल्याचे वाटल्याने नागरिकांची गर्दी झाली होती. किरण यांनी त्यांच्या ओळखीचे नीलेश बिरारी यांना माहिती दिली. बिरारी यांनी ११२ क्रमांकावर घटनेची माहिती देत पोलिस मदत मागवली. दरम्यान, तेथे दुचाकी चोरीचा तपास करत असलेले पोलिस अंमलदार सोनू खाडे यांनी गर्दी दिसल्याने चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चोरट्यास ताब्यात घेत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे १२१ ग्रॅम वजनाचे सोने व गुन्ह्यांमध्ये वापरलेली दुचाकी असा एकूण सात लाख २१ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी जबरी चोरीतील दागिने शिवाजीनगर येथील एस. के. ज्वेलर्स दुकान मालक मनोहर बाबूराव कुमावत यास विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी किरण ताडगे व नीलेश बिरारी यांचे अभिनंदन केले. गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एन. व्ही. पवार, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, अंमलदार रवींद्र मोहिते, गिरीश महाले, गणेश रेहरे, मिलिंदसिंग परदेशी, तुषार मंडले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

चोरट्यांकडून अनेक गुन्ह्यांची उकल

पोलिसांनीही तपास करीत दुसऱ्या संशयितालाही पकडले. दोघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार आणि सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

हेही वाचा :

Back to top button