Telangana Assembly Elections : तेलगू देसम आऊट होण्याचा जनसेना पार्टीला फायदा | पुढारी

Telangana Assembly Elections : तेलगू देसम आऊट होण्याचा जनसेना पार्टीला फायदा

उमा महेश्वर राव

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय तेलगू देशम पार्टीने (टीडीपी) घेतला आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर हा पक्ष तेलंगणामधून हद्दपार झाला होताच. मात्र, आता खुद्द आंध्रमध्ये या पक्षाला घरघर लागली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने आगामी काळात आंध्रवर सर्व लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तेलंगणामधले लक्ष काढण्यात आले आहे. तेलंगणामध्ये टीडीपी आणि जनसेना पार्टी यांची आघाडी आहे. आता टीडीपी स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याचा आपसूक फायदा जनसेना पार्टीला मिळणार आहे. राज्यातील कम्मा आणि कप्पू समाजाची पारंपरिक मते टीडीपीकडे जातात. ही मते जनसेना पार्टीकडे वळण्याचा अंदाज आहे. जनसेना पार्टीकडून 10 ते 12 जागा लढविल्या जाण्याचा अंदाज आहे.

मागास समाजाच्या मतपेढीवर भाजपचा डोळा…

तेलंगणामध्ये भाजपचे सरकार सत्तेत आले, तर मागास समाजातील नेत्याला मुख्यमंत्री केले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेत सांगितले आहे. एकप्रकारे मागास समाजाच्या मतपेढीवर डोळे ठेवून भाजपने ही घोषणा केली असल्याचे मानले जात आहे. एकीकडे मागास समाजाला मुख्यमंत्रिपद देण्याची घोषणा केली जात असताना, दुसरीकडे सत्ता आल्यास मुस्लिम समाजाला देण्याता आलेले आरक्षण रद्द करण्यात येईल, असेही भाजपने सांगितले आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास पक्षाचा विरोध असल्याचे तार्किक यामागे देण्यात आले आहे. राज्यात मागास समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भाजप या समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

नेत्यांच्या कोलांटउड्या सुरूच…

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. जसजशी मतदानाची तारीख जवळ येत चालली आहे, तसा उलटा प्रवाहही चालू झाला आहे. याचा अर्थ काँग्रेसमधून बीआरएस मध्ये जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. नागरकुर्नुल मतदारसंघात काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले वरिष्ठ नेते नागम जनार्दन रेड्डी हे बीआरएसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसने नागरकुर्नुल मधून के. राजेश रेड्डी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघात बीआरएसने नागम जनार्दन रेड्डी यांना संधी दिली, तर राजेश रेड्डी यांना विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

निवडणुकीतील वाढता हिंसाचार…

सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हिंसाचारही वाढीस लागला आहे. मेडक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर झालेला चाकूहल्ला हे त्याचे द्योतक म्हणावे लागेल. डुबाक विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना बीआरएस नेते असलेल्या रेड्डी यांच्यावर हल्ला करण्यात आला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच ते या हल्ल्यातून बचावले आहेत.

Back to top button