Samriddhi Highway : ११२ कि.मी.च्या समृद्धीने १० महिन्यांत घेतले २४ बळी | पुढारी

Samriddhi Highway : ११२ कि.मी.च्या समृद्धीने १० महिन्यांत घेतले २४ बळी

छत्रपती संभाजीनगर : उभ्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर धडकून नाशिक जिल्ह्यातील १२ जणांना जीव गमवावा लागला. या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११२ कि.मी. च्या या महामार्गावर १० महिन्यांत १२५ अपघातांमध्ये २४ प्रवासी ठार तर २५२ जण जखमी झाले. समृद्धीवरील अपघाताची कारणे स्पष्ट झालेली असतानाही सरकार काहीच उपाययोजना करीत नाही, हे गंभीर आहे.  (Samriddhi Highway)

संबंधित बातम्या :

११ जुलैच्या रात्री टायर फुटल्यामुळे भीषण अपघात होऊन खासगी बसने पेट घेतला होता. यात होरपळून २५ प्रवसी ठार झाले होते. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या अपघातानंतर समृद्धीवरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. चालकाला डुलकी लागू नये, वाहनाचे टायर फुटू नये, वाहनांच्या वेगावर मर्यादा घालता याव्यात यासारख्या प्रमुख बाबी समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सरकारने विशेष काही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे.

समृद्धी महामार्गावर पहिल्या चार महिन्यांत तब्बल साडेतीनशे अपघात होऊन ३९ जणांना जीव गमवावा लागला होता. यातील १०४ अपघात हे चालकाला डुलकी लागल्याने किंवा शेकडो कि.मी.चा प्रवास केल्यावर थकल्यामुळे आणि ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडल्याचे निष्कर्ष समोर आले होते. चार महिन्यांत ३९ वर असलेला मृतांचा आकडा सहा महिन्यांत ८२ वर गेला आहे. (Samriddhi Highway)

मनुष्यबळ अपुरे अधिकारी, कर्मचारी वाढवा

महामार्ग पोलिसांकडे आधीच अपुरे मनुष्यबळ आहे. त्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुला झाल्यावर अधिकारी, कर्मचारी वाढवावेत, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, अद्याप मनुष्यबळ वाढविलेले नाही. समृद्धी महामार्गासाठी महामार्ग पोलिस केंद्रांत ४ अधिकारी व १९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी आणखी ८ अधिकारी आणि ६२ कर्मचारी वाढविण्याची मागणी केली होती, पण ती अद्याप पूर्ण झालेली नाही. रात्री अपरात्रीच्या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, सहायक पोलिस निरीक्षक अरुणा घुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी अपघातस्थळी दाखल होता. (Samriddhi Highway)

अपघाताची प्रमुख कारणे

  • रोड हिप्नोसिसमुळे चालकाला डुलकी लागणे
  • अतिवेगाने ८३ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटणे.
  • अतिरिक्त भार असलेली वाहने चालवणे
  • चालकाचे लक्ष विचलीत होणे.
  • सिमेंट रोड असल्याने वाहनाचे टायर फुटणे

Back to top button