पुणे जिल्ह्यात यंदा सर्पदंश घटले ! | पुढारी

पुणे जिल्ह्यात यंदा सर्पदंश घटले !

पुणे : जिल्ह्यात दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात सर्पदंशाच्या घटना घडतात. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. गेल्या वर्षी 617 सर्पदंशाच्या घटना घडल्या होत्या. या वर्षी सर्पदंशाच्या 430 घटनांची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी
डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, मुळशी, भोर, वेल्हा या दुर्गम भागात सर्पदंशाच्या घटना नेहमी इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त असतात. दरम्यान, जिल्ह्याच्या तुलनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली. पुण्यात 66, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 124 सर्पदंशाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ग्रामीण भागात 14 तालुक्यांपैकी तीन तालुक्यांमध्ये सर्पदंश संख्या जास्त नोंदवली गेली.

यामध्ये जुन्नर तालुक्यात 54, शिरूर तालुक्यात 35 आणि हवेली तालुक्यात 18 घटना घडल्या, तर 2022 मध्ये जुन्नरमध्ये 115, तर शिरूर आणि हवेली तालुक्यांत अनुक्रमे 48 आणि 29 सर्पदंशाच्या घटना नोंदवल्या गेल्या. डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, बहुसंख्य प्रकरणे जुन्नर, बारामती, हवेली यांसारख्या ग्रामीण आणि आदिवासी भागांत आढळून येत आहेत. सध्या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशासाठी लसींचा अतिरिक्त संग्रह आहे. सर्पदंशाच्या केसेस हाताळण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे साप आढळतात. कोब्रा, कॉमन क्रेट, रसेल वायपर आणि इचिस कॅरिनेटस या चार प्रकारचे विषारी साप पुण्यात आढळतात. पावसाळ्यामुळे या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जून ते ऑगस्ट या कालावधीत सर्पदंशाचे प्रमाण अधिक असते. सर्पदंशाच्या घटना घडल्या असूनही गेल्या दोन वर्षांत जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा :

पाचवी-आठवीचा निकाल आज ऑनलाइन जाहीर होणार

रशियात विमान दुर्घटनेत १० जण ठार; पुतीन विरोधात बंड पुकारणारे प्रिगोझीन देखील विमानात

Back to top button