पुणे : संतोष जगताप खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत | पुढारी

पुणे : संतोष जगताप खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

लोणी काळभोर ; पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन येथे संतोष जगताप याच्यावर गोळीबार करुन त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार उमेश सोपान सोनवणे (रा.राहू ता.दौंड) यास लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे वाळू व्यावसायिक संतोष जगताप याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यात जगताप जागीच ठार झाला, तर दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल जगताप याच्या अंगरक्षकांनी गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर जागीच ठार झाला तर अन्य पळून गेले होते.

त्यापैकी पवन मिसाळ व महादेव आदलिंग या दोघांना पळसदेव (ता. इंदापूर) येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती वरून या हल्ल्यात मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु तो हाती लागला नव्हता. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोकाशी यांनी सोनवणे याला पकडण्यासाठी तपास पथकास सूचना दिल्या.

तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उमेश सोनवणे हा कानिफनाथ हाटेल (पिर फाटा ता. शिरूर) येथे येणार आहे. याबद्दल त्यांनी वरिष्ठ निरीक्षक मोकाशी यांना माहिती दिली.

त्यांनी पथकासह तेथे सापळा रचून त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या. यावर पथकासह राजू महानोर तेथे पोहोचले व मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनवणे तेथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे या पथकाने केली.

Back to top button