धुळे : हत्याराची तस्करी रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन | पुढारी

धुळे : हत्याराची तस्करी रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मध्य प्रदेशातून होणाऱ्या शस्त्र तस्करीला रोखण्यासाठी आता दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील पोलीस दलाच्या प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर विशेष मोहीम राबवून शस्त्र तयार करणारी यंञणा नष्ट केली जाईल, अशी माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगवी पोलिसांनी शस्त्र तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार बनावट पिस्तूल, सहा मॅक्झिन आणि सात काडतुस जप्त केलेल्या कारवाईची देखील त्यांनी माहिती दिली.

कराडच्या दोघांकडून हत्याराचा साठा जप्त

मध्यप्रदेशातून शिरपूर मार्गे हत्याराची तस्करी होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक संदीप पाटील, सुनील वसावे, मंगला पवार, संदीप ठाकरे, संतोष पाटील, योगेश मोरे, संजय भोई यांचे पथक गठीत करून कारवाई करण्यासाठी रवाना केले. मिळालेल्या माहितीनुसार सीमा तपासणी नाक्याजवळील ब्लॅक हार्ट रेस्टॉरंट जवळ रस्त्यावरून दोन तरुण पायी येताना दिसले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्यांना थांबवण्याचा इशारा केला. मात्र पोलीस आल्याचे पाहून दोघा संशयतांनी पळ काढला. त्यामुळे पाठलाग करून त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे निलेश हनुमंत गायकवाड आणि मनीष संजय सावंत असे सांगितले. हे दोन्हीही तरुण सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी असल्याची माहिती देखील पोलीस पथकास दिली. यावेळी पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता निलेश गायकवाड यांच्या जवळील बॅगमधून चार गावठी बनावटीचे पिस्तुल, सहा मॅक्झिन आणि संजय सावंत यांच्या खिशातून सात जिवंत काडतूसचा साठा मिळून आला. त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान या कारवाईचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत कौतुक केले आहे. ही कारवाई करणाऱ्या पथकाला त्यांनी दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

दोन्ही राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून होणारी हत्याराची तस्करी रोखण्यासाठी यापूर्वी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. मात्र त्या दिवशी मध्य प्रदेशात राजकीय नेत्याचा कार्यक्रम असल्यामुळे संबंधित बडे अधिकारी या मोहिमेत सहभागी होऊ शकले नाही. आता दोन्हीही राज्यातील विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच आणखी संबंधित पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अधिकारी तसेच मध्य प्रदेशातील देखील सीमावर्ती भागातील पोलीस अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. ही बैठक धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित केली जाणार असल्याने तिचे शिरपूर शहरात आयोजन होणार असल्याची शक्यता देखील पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीत यापूर्वी मध्य प्रदेशातील हत्यार तयार करणाऱ्या गावासह अन्य संशयित ठिकाणांवर छापे टाकण्याचे नियोजन केले जाणार आहे. यातून हत्यार तस्करी कायमस्वरूपी रोखण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button