पिंपरी : नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कर्मचार्‍यांनी काम करावे | पुढारी

पिंपरी : नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत कर्मचार्‍यांनी काम करावे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची कार्यपद्धती गतिमान होण्यासाठी 35 हून अधिक आयटी अ‍ॅप्लिकेशन्स एकात्मिक पद्धतीने विकसित केले आहेत. ती नवी प्रणाली पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध 40 विभागांमध्ये लागू होणार आहे. 15 ऑगस्टपूर्वी या संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिका कर्मचार्‍यांनी या तंत्रज्ञानासोबत जुळवून घेऊन
काम सुरू करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी दिल्या.

जीआयएस ईआरपी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांची चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे बुधवारी (दि. 19) प्रशिक्षण कार्यशाळा झाली, या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, उज्वला गोडसे, सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

शहरातील सहा लाख मालमत्तांचे सर्वेक्षण

शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस सर्वेक्षण स्मार्ट सिटी कंपनीमार्फत हाती घेण्यात आले आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटी कंपनी यांच्याकडून संयुक्तपणे सर्वेक्षणाचे कामकाज करण्यात येत आहे. जीआयएस, ईआरपी व डिजिटल वर्क फ्लो व्यवस्थापन सुरू झाल्यापासून एकत्रितपणे विकसित केले जात आहे. शहरातील सहा लाख मालमत्तांचे सर्वेक्षण केले जात आहे, असे निळकंठ पोमण यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामे शोधता येणार

मिळकतीचे सर्वेक्षण व माहिती संकलित करण्यासाठी ऐटॉस इंडियामार्फत सर्व्हेअर नेमणूक करण्यात आले. महापालिकेचे सर्व विभाग जीआयएस वातावरणात ईआरपीद्वारे जोडण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेच्या विविध भू-स्थानिक माहितीचा वापर होऊन नागरिकांना कार्यक्षम व प्रभावीपणे सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानाने अनधिकृत बांधकामे, शहराची वाढ, अतिक्रमण शोधून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे स्मार्ट सिटीचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

हेही वाचा

महत्त्वाची बातमी ! वरंधा घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीकरिता बंद

हिंदूजन आक्रोश मोर्चामुळे दणाणले कोपरगाव शहर..!

खरवंडी कासार चौकीत सशस्त्र पोलिस नेमा; काशीबाई गोल्हार

Back to top button