वाटा विकासाच्या : रेन हार्वेेस्टिंगने शिरसाटे गाव झाले ‘जलयुक्त’ | पुढारी

वाटा विकासाच्या : रेन हार्वेेस्टिंगने शिरसाटे गाव झाले ‘जलयुक्त’

नाशिक : वैभव कातकाडे
इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावाने जलसंधारणामध्ये 29 दगडी बांध बांधले असून, डोंगरावरून पाणी आल्यास माती व पाणी वाहून जाऊ नये, यासाठी 1200 मीटरच्या 4 डीप सीसीडी अर्थात चारी खोदकाम केले आहे. जेणेकरून पाणी जागेवरच झिरपेल व त्यामध्ये पाण्याचा अपव्यय न होता गावाच्या पाण्याचा स्रोत आणखी वर येईल. त्याचा फायदा गावातील विहिरी, हातपंप यांच्यावर अवलंबून असलेल्यांना होत आहे.

पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी गावातील सर्व शासकीय इमारतींवरील पाण्याला रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून गोळा करण्यासाठीची सिस्टीम कार्यान्वित केली आहे. ही सिस्टीम राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये करण्याच्या सूचना काही वर्षांपूर्वीच राज्य शासनाने केल्या होत्या. मात्र, सकारात्मक प्रतिसाद किती मिळाला हा संशोधनाचा विषय असला, तरी या ग्रामपंचायतीने रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प यशस्वी केल्याचे दिसते.

समृध्द गाव www.pudhari.news

त्याचप्रकारे गावात सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत अभिसरण योजनेंतर्गत 1285 मीटर आरसीसी 100 टक्के भूमिगत गटार करण्यात आलेली आहे. सर्व पाणी गावाच्या दोन कोपर्‍यांत एकत्रित केले जाते व सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी स्थिरीकरण तळ्याचे कामदेखील प्रस्तावित असून, या पाण्याचा पुन्हा वापर हा वृक्षांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी होणार आहे. काही घरे ही भूमिगत गटारींना जोडलेली नाही, तिथे रोजगार हमी योजनेंतर्गत 50 ठिकाणी शोषखड्डे घेण्यात आले आहेत.

समृध्द गाव www.pudhari.news

स्वच्छ गाव म्हणून मिळाली ओळख
शिरसाटे हे गाव 100 टक्के हगदारीमुक्त गाव आहे. या गावात शासकीय योजनांच्या माध्यमातून रस्ते, घरकुल योजना, स्वच्छ भारत मिशन पूर्ण करण्यात आले आहे. घनकचर्‍याचे योग्य नियोजन करण्यात आल्याने हे गाव स्वच्छ गाव म्हणूनदेखील ओळखले जात आहे. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गोकुळ सदगीर, उपसरपंच शीतल चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, सदस्य श्यामसुंदर सोपनर, तारा तेलंग, रमेश शिद, अलका दोंदे, शंकर गांगुर्डे, कर्मचारी भास्कर सदगीर, भावराव गांगुर्डे, संपत सप्रे, दिनकर म्हसणे हे गावाची धुरा सांभाळत आहेत.

* शिरसाट ग्रामपंचायत पारदर्शकपणे कारभार करीत आहे. याचेच उदाहरण म्हणजे या गावची स्वतंत्र वेबसाइट होय. विविध योजना तसेच गावातील विकासासाठीची सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच गावाचा लेखाजोखा दैनंदिन टाकण्यात येतो. गावात फुलपाखरू पार्क उभारले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला कंपाउंड केले आहे. त्या कंपाउंडला फुलपाखरू पार्क नाव देण्यात आले आहे.

* घनकचरा व्यवस्थापनांतर्गत 100 टक्के कचरा संकलन, 100 टक्के विलगीकरण व 100 टक्के ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत एकूण 15 ठिकाणी ओला-सुका कचरा वेगळा व प्लास्टिक कचरा वेगळा टाकण्यासाठी कचराकुंडी लावण्यात आलेली असून, सायकलचलित घंटागाडीद्वारे कचराकुंडीतील कचरा एका ठिकाणी संकलित करण्यात येतो. कचरा विगतवारी मशीनद्वारे वेगवेगळा कचरा केला जातो.

समृध्द गाव www.pudhari.news
नाशिक : ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी करण्यात आलेली सोय. (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे)

* 1285 मीटर आरसीसी भूमिगत गटार योजना पूर्ण
* 15 ठिकाणी ओला-सुका कचर्‍यासाठी कुंड्या ठेवल्या
* 50 ठिकाणी शोषखड्डे तयार केलेत.                                                                                                                        (उत्तरार्ध)

हेही वाचा:

Back to top button