

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिल्या महिला प्रीमियर लीग (WPL) खेळाडूंचा लिलाव आज (दि.१३) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. लिलावात ४०९ खेळाडूंपैकी ९० खेळाडूंचा लिलाव होणार असून यात भारतासह १५ देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. ५ फ्रँचायझी यातून आपापल्या संघाची निवड करतील. कोणता खेळाडू सर्वाधिक किंमत मिळवणार, याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत.
लिलावासाठी १५२५ खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात २४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. २४ खेळाडूंची सर्वोच्च आधारभूत किंमत ५० लाख रुपये आहे. यामध्ये १४ विदेशी आणि १० भारतीय खेळाडू आहेत. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, अलिसा हिली, एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन, डायंड्रा डॉटिन यांचा समावेश आहे. दरम्यान, महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत T20 विश्वचषक खेळत आहे. परंतु संघांच्या खेळाडूंचे लक्ष या लिलावाकडे लागले आहे.
लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी प्रत्येक संघाकडे १२ कोटी रुपये असतील. ३० परदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त ९० खेळाडू निवडले जाणार आहेत. फ्रँचायझी १८ खेळाडूंमधून संघ तयार करू शकतात. यामध्ये १२ भारतीय आणि सहा विदेशी खेळाडू असतील.
प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ परदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. परंतु पाचवा परदेशी खेळाडू सहयोगी देशाचा असावा. या लिलावात भारताची ४१ वर्षीय लतिका कुमारी ही सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर शबनम, सोनम यादव आणि विनी सुजन या लिलावातील सर्वात तरुण खेळाडू आहेत. एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.
या लिलावातून अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळू शकते. बीसीसीआय या लीगचे आयोजन करत आहे. ही लीग मार्चमध्ये आयोजित केली जाणार आहे. लिलावात भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, झिम्बाब्वे या देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. तसेच यूएई, हाँगकाँग, थायलंड, नेदरलँड आणि यूएसए या सहयोगी देशांतील आठ खेळाडू आहेत.
हेही वाचा :