

केपटाऊन, वृत्तसंस्था : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत इंग्लंडने आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. 'ब' गटातील सामन्यात इंग्लिश संघाने वेस्ट इंडिजचा सात विकेटस् आणि 33 चेंडू राखून पराभव केला. हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखाली विंडिजने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 7 गडी गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 14.3 षटकांत 3 विकेटस्च्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. याचबरोबर स्पर्धेच्या इतिहासात मोठ्या फरकाने चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकण्याचा विक्रम इंग्लिश संघाने नोंदवला.
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणार्या वेस्ट इंडिजने धमाकेदार सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये कर्णधार मॅथ्यूज हिने (32 चेंडूंत 42) स्टेफनी टेलरसह 47 धावांची सलामी दिली. या भागीदारीत टेलरने अवघ्या तीन धावांचे योगदान दिले आणि सातव्या षटकात ती बाद झाली. मॅथ्यूज 11व्या षटकात तंबूत परतली. ती बाद झाल्यानंतर, शेमेन कॅम्पबेल (37 चेंडूंत 34) वगळता एकाही कॅरेबियन खेळाडूचा टिकाव लागू शकला नाही. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने 23 धावांत सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या. (Women's T20 World Cup)
136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर सोफिया डंकले आणि डॅनियल व्याट यांनी पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. मात्र, व्याटला मोठी खेळी खेळता आली नाही. ती चौथ्या षटकात 9 चेंडूंत 11 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. डंकलेने 18 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 34 धावा जोडल्या. त्यानंतर एलिस कॅप्सी (13) फार काही करू शकली नाही आणि आठव्या षटकात तिने आपली विकेट गमावली. 71 धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर नॅट सायव्हर ब्रंट एक षटकार आणि कर्णधार हिदर नाईट या दोघींनी संघाचा डाव सांभाळून 67 धावांची विजयी भागीदारी रचली.