औरंगाबाद : विद्युत खांबाला स्पर्श झाल्‍याने चिमुकल्याचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : विद्युत खांबाला स्पर्श झाल्‍याने चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा घराबाहेर खेळत असताना विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून, ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना २६ जानेवारीला संध्याकाळी हर्सूल परिसरातील फातेमानगर येथे घडली. शेख नाजिम शेख वसीम (रा.फातेमनगर) असे मुलाचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नाजिमचे वडील शहरातील एका ट्रॅक्टर कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहेत, तर आई गृहिणी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी नाजिम घराबाहेरील पटांगणात खेळत होता. तर आई-वडील घरात होते. दरम्यान, खेळताना घरासमोरील विद्युत खांबाला नाजिमचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्याने तो निपचित जमिनीवर पडला. हा प्रकार शेजाऱ्यांनी पाहिला. त्यांनी ही बाब नाजिमच्या आई वडिलांच्या निदर्शनास आणून दिली. आई-वडिलांनीही घराबाहेर धाव घेतली.

बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नाजिमला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button