औरंगाबाद : औट्रम घाटात ट्रकची कारला भीषण धडक; १ ठार, ३ जखमी | पुढारी

औरंगाबाद : औट्रम घाटात ट्रकची कारला भीषण धडक; १ ठार, ३ जखमी

कन्नड ; पुढारी वृत्तसेवा : कन्नड – चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटात सरदार पॉईंटवर काल (रविवार) दुपारी चार वाजता पाठीमागून येणाऱ्या ट्रकने कारला पाठमागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई रामचंद्र पवार (वय 68) यांचे निधन झाले. कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. यात एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. सर्व जखमी राहणार गोळेगाव, तालुका सिल्लोड हल्ली मुक्काम औरंगाबाद यांचा समावेश आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे; मालेगाव येथे प्रदीप मिश्रा यांच्या शिवपूराणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या कार्यक्रमासाठी कृष्णा संदीप गव्हाणे (वय 66) ,अश्विनी बंटी गव्हाणे (वय 30), गौरी कृष्णा गव्हाणे (वय 9 वर्ष) सर्व राहणार गोळेगाव ता. सिल्लोड सध्या मुक्काम पिरबाजार, औरंगाबाद हे आपल्‍या कार क्रमांक एचएमच २० ईई 54 70 यात बसून शिवपूराण ऐकण्यासाठी मालेगाव येथे निघाले होते. कृष्णा गव्हाणे यांची बहीण चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा परिषद सदस्या यमुनाबाई पवार यांनाही त्यांनी चिंचोली येथून सोबत घेतले. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील औट्रमघाटातील सरदार पॉईंट जवळ आले असता, समोरून ट्रक क्रमांक डीजे जीजे 36 व्ही 78 52 हा अचानक उभा राहिला.

दरम्यान, कारच्या मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक टीएन 36 डब्ल्यू 3999 याने कारला जोरात धडक दिली. या धडकेमुळे बेलोनो कार समोरच्या ट्रकमध्ये घुसली. पाठीमागील धडक मारणारा ट्रक व पुढील ट्रकमध्ये कारचा चेंदामेंदा झाला. यात कारमध्ये बसलेल्या चिंचोली लिंबाजी येथील माजी जिल्हा सदस्य यमुना बाई पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कारमधील कारचालक कृष्णा संदीप गव्हाणे (वय 66), अश्विनी कृष्णा गव्हाणे (वय 30) व गौरी कृष्णा गव्हाणे (वय 9 वर्ष ) हे गंभीर जखमी झाले. यात अश्विनी कृष्णा गव्हाणे या गरोदर आहेत. अपघाताचे वृत्त कळताच चाळीसगाव येथील महामार्ग पोलिस केंद्रावरील सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील, सहाय्यक फौजदार प्रताप पाटील, अशोक चौधरी, सुनील पाटील, योगेश बेलदार, वीरेंद्र सुसोदे, दिवाकर जोशी, संजय सोनवणे, ईशांत तडवी, भागवत पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

मात्र, पाठीमागच्या ट्रकच्या धडकेत कार समोर थांबलेल्‍या ट्रकमध्ये घुसल्याने कारचा चुराडा झाला. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रेस्क्यू पथकास पाचारण केले. रेस्क्यू पथकाचे प्रमुख आकाश मंदोरे हे क्रेनसह अपघात स्थळी उपस्थित झाले. त्यांनी क्रेनद्वारे फसलेली कार व ट्रक वेगवेगळे करून जखमींना बाहेर काढले.

जखमींना चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मंदार करंबेळकर यांनी उपचार केले. अपघातात घटनास्थळीच मृत्यू पावलेल्या यमुनाबाई पवार या चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पश्चात चिंचोली लिंबाजी येथील दहा वर्ष सरपंच असलेले त्यांचे पती रामचंद्र बाळा पवार, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

पाठीमागून धडक देणारा ट्रक चालक फरार झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. औट्रमघाटात भुयारी मार्ग नसल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. हा घाट आता मृत्यूचा सापळा बनला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले. मात्र भुयारी मार्ग न झाल्यामुळे वाहतूक कोंडी होतच आहे. निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रस्ता रोको आंदोलन करूनही अद्याप भूयारी मार्गाला गती मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button