ICICI बँक फसवणूक प्रकरणी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांना अटक

ICICI बँक फसवणूक प्रकरणी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांना अटक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICICI बँक फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांना अटक केली आहे. याआधी या प्रकरणी सीबीआयने ICICI बँकेच्या माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉनला मंजूर केलेल्या कर्जामध्ये फसवणूक आणि अनियमितता आढळून आल्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने शनिवारी कोचर यांना मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. सीबीआयने म्हटले आहे की कोचर तपासात सहकार्य करत नाहीत. कोचर आणि धूत यांचा ३ हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात सहभाग आहे.

आयसीआयसीआय (ICICI Bank) बँक कर्ज फसवणूक प्रकरणी (ICICI Bank Fraud Case) सीबीआयने बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर व त्यांचे पती आणि व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणूगोपाल धूत यांच्यासह नुपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड हे गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित आयपीसी कलमांखाली नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपी आहेत.

व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवरमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. सीबीआयने २०१९ मध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर एका निवेदनात म्हटले होते की आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक करण्याच्या गुन्हेगारी कटात खासगी कंपन्यांना काही कर्ज मंजूर केले होते.

मे २०२० मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चंदा कोचर आणि त्यांच्या पतीची कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि त्याच्याशी संबंधित इतर प्रकरणांमध्ये चौकशी केली होती. हे कर्ज ICICI बँकेने २००९ आणि २०११ मध्ये व्हिडिओकॉनला दिले होते. त्यावेळी चंदा कोचर या बँकेच्या एमडी आणि सीईओ होत्या. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. यानंतर ईडीने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती.

२००९ मध्ये चंदा कोचर यांना सीईओ आणि एमडी बनवण्यात आले. चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली, आयसीआयसीआय बँकेने किरकोळ व्यवसायात पाऊल टाकले, ज्यामध्ये त्यांना प्रचंड यश मिळाले. बँकेची कर्जदार कंपनी व्हिडिओकॉनने दीपक कोचर यांच्या कंपनीत केलेल्या गुंतवणुकीला घेऊन झालेल्या घोटळ्यांच्या आरोपानंतर चंदा कोचर यांनी बँकेच्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news