नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने | पुढारी

नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
वावी पोलिसांनी काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतरही नांदूरशिंगोटे परिसरात चोर्‍या, दरोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नाशिक-नगर हद्दीवर निमोण रस्त्यालगत बुधवारी (दि.14) पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा दरोडा पडला. आबा शेळके यांच्या वस्तीवर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार चाकू व कटावणीचा धाक दाखवून दहा हजार रुपये रोख रकमेसह दोन तोळे दागिने चोरून नेले. सुदैवाने या घटनेत या कुटुंबातील सदस्यांना मारहाण झाली नाही.

सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. धारदार चाकू व कटावणीचा धाक दाखवून शेळके कुटुंबीयांना गप्प बसण्यास सांगितले. पैसे व दागिन्यांसाठी त्यांनी धमकावत घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. दहा हजार रोख रकमेसह दोन तोळे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले. तेथून निघताना त्यांनी घरातील लोकांना दरवाजा उघडायचा नाही व कुणाला फोन करावयाचा नाही, असे दरडावले. त्यांनी पळून जाताना दुसर्‍या दरवाजाला दोराच्या साह्याने बांधून एक टोक पडवीला बांधून ठेवले. हा प्रकार शेळके यांच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारच्या वस्तीवर फोन केला. तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. शेळके यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला तेव्हा आबाजी शेळके, संजय शेळके, कविता शेळके, स्वाती शेळके, कार्तिक शेळके व सार्थक शेळके आदी घरात होते. मात्र, सहा शस्त्रधारी दरोडेखोर असल्यामुळे त्यांना गप्प राहणे भाग पडले. चोरटे मराठीत बोलत होते व त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्याचप्रमाणे त्यांनी हाफ पॅन्ट घातलेली होती. वस्तीपर्यंत जाण्यास साधा रस्ताही नसल्याने तसेच आसपास मक्याचे शेत असल्यामुळे घटनास्थळी पोहोचण्याचे कोणीही धाडस केले नाही. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रात्रीची वेळ असल्यामुळे दरोडेखोरांचा काहीही मागमूस लागला नाही. तत्पूर्वी अशोक कांडेकर यांच्या बंगल्यावर मंगळवारच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी बंगल्याचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार कांडेकर यांच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत दरोडेखोरांनी बंगल्याचे तीन दरवाजे तोडलेले होते. आरडओरड होताच चोरटे पसार झाले. त्यानंतर त्यांनी निमोण रस्त्यालगत चांदभाई सय्यद यांच्या नव्या बंगल्याचे गेट उघडले. मात्र, चांदभाई बंगल्यात रहायला गेलेले नव्हते. ते शेजारच्या पडवीमध्ये झोपलेले होते. कुत्रे भुंकण्याचा आवाजाने त्यांना जाग आली. बंगल्याजवळ दोन जण उभे असलेले दिसले. चांदभाईंनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले. साधारणतः मध्यरात्री 1 वाजता हा प्रकार घडला. या परिसरात शेतकरी जागे झाले. त्यांनी बॅटर्‍या लावून आसपासचा परिसर पिंजून काढला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

म्हाडा कॉलनीत भरदिवसा चोरीचा प्रयत्न
दरम्यान, नांदूरशिंगोटे येथे चास रस्त्यालगत म्हाडा कॉलनीमध्ये राकेश निचित हे वायरमन परिवारासह राहतात. त्यांच्या पत्नी वर्षा सकाळी दहा वाजता मुलाला अंगणवाडीत सोडण्यासाठी गेल्या असता त्यांच्या बंगल्याचा मागचा दरवाजा उघडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडीकडून परतल्यानंतर दरवाजा उघडताच त्यांना घरात चौघे चोरटे आढळले. वर्षा निचित घाबरल्या. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी त्यांना बांधून ठेवत धूम ठोकली. दहा ते पंधरा मिनिटांनंतर त्यांनी स्वत:ची सुटका करीत शेजार्‍यांना आवाज दिला. त्यानंतर वर्षा निचित बेशुद्ध होऊन पडल्या. त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले. शुद्धीवर आल्यानंतर घडलेला प्रसंग कथन केला. चोरट्यांनी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेले होते. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे निचित यांनी सांगितले. वावी पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा:

Back to top button