नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक वारसा सप्ताहाचे औचित्य साधून सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग आणि अभिरक्षक, प्रादेशिक वस्तुसंग्रहालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार (दि. 21) पासून सहायक संचालक पुरातत्त्व विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या राज्य संरक्षित स्मारकांचे, छायाचित्रांचे प्रदर्शन तसेच नीलेश व पूजा गायधनी व सोज्वळ साळी यांच्या दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले करण्यात आले आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत दुर्मीळ वस्तू नाशिककरांना पाहता येणार आहे.
गत आठवड्यात इंटेक नाशिक चॅप्टरच्या पुढाकारातून 'सिम्बोलिस्म आणि आयकोनोग्राफी इन इंडियन टेम्पल्स' या विषयावर के. व्ही. वेणुगोपालन यांचे व्याख्यान झाले. इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटेक नाशिक चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने वॉल पेंटिंग आणि बोहाडा मुखवटा तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील वाड्यामध्ये श्रीमद् भगवद्गीता पठणाचा कार्यक्रम झाला. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉ. माया पाटील-शहापूरकर यांनी 'भारतीय मंदिर स्थापत्य' या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन केले. दरम्यान, मंगळवारी (दि. 22) दुपारी 2 ला वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्टच्या वतीने सुंदर हस्ताक्षर मोडी लिपी स्पर्धा सरकारवाडा येथे होणार आहे. बुधवारी (दि. 23) मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक यूट्यूब लाइव्हच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 24) यूट्यूबच्या माध्यमातून 'प्राचीन पर्शियन क्यूनिफॉर्म व भाषेचा इतिहास आणि आवश्यकता' यावर शैलेश क्षीरसागर हे मार्गदर्शन करणार आहेत.
स्मारकांमध्ये स्वच्छता मोहीम…
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त नीळकंठेश्वर मंदिर (नाशिक), रंगमहाल (चांदवड), साल्हेर किल्ला (बागलाण), अंकाई किल्ला (येवला), सरकारवाडा (नाशिक), वैजनाथ महादेव मंदिर (सिन्नर) या राज्य संरक्षित स्मारकांवर तसेच धर्मवीरगड किल्ला (श्रीगोंदा, अहमदनगर) या असंरक्षित स्मारकावर सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.