नाशिक : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीमुळे सिन्नरकरांच्या नाशिकवारीला मिळणार ब्रेक | पुढारी

नाशिक : वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजुरीमुळे सिन्नरकरांच्या नाशिकवारीला मिळणार ब्रेक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या निर्णयाचे सिन्नर बार असोसिएशनसह नागरिकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे अनेक दावे नाशिकऐवजी आता सिन्नरला दाखल करता येणार असल्याने सिन्नरकरांच्या नाशिक वारीला ‘ब्रेक’ लागणार असून वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

यापूर्वी पाच लाखांपुढील मालमत्तेचा दावा, कौटुंबिक वादविवादात फारकत, नांदायला येणे, भूसंपादनाचा वाढीव मोबदला, शासनाच्या विरोधातील दावे यासाठी नाशिकच्या वरिष्ठ न्यायालयात पक्षकार आणि वकीलांना जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैसा वाया जात होता. याशिवाय नाशिकच्या वरिष्ठ न्यायालयात विविध दाव्यांचे प्रमाण अधिक असल्याने निकालासाठी वाट पहावी लागत होती. सिन्नरला वरिष्ठ न्यायालय मंजूर झाल्याने वकील व पक्षकारांना वरील दाव्यांसाठी नाशिकला जाण्याची गरज भासणार नाही. या निर्णयाचे सिन्नर बार असोसिएशनने स्वागत केले आहे. गेल्या काही वर्षांपासून सिन्नरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू व्हावे, यासाठी सिन्नर बार असोसिएशनसह सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रयत्न केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी मिळाल्याने सिन्नरकरांना ‘सेशन’ वगळता, अनेक दाव्यांसाठी नाशिकला जाण्याची गरज भासणार नाही.

यापूर्वी तहसीलदार, जिल्हाधिकारी, विविध शासनाचे अधिकारी यांच्याविरोधात किंवा शासनाच्या निर्णयाविरोधात दावा दाखल करण्यास नाशिकला जावे लागत होते. आता अशा प्रकरणांत सिन्नरला मंजूर झालेल्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याचा मार्ग मोकळा होईल. या निर्णयामुळे पक्षकारांनाही दिलासा मिळेल. -अ‍ॅड. विलास पगार, वकील, सिन्नर.

“सिन्नरला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयास मंजुरी मिळाली, ही स्वागतार्ह बाब आहे. हे न्यायालय सुरू झाल्यानंतर वकिलांपेक्षा पक्षकारांना अधिक फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासनू सिन्नर तालुका बार असोसिएशन यासाठी पाठपुरावा करीत होते. त्या प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच कामकाज सुरू होईल.” -अ‍ॅड. जयसिंह सांगळे, अध्यक्ष, सिन्नर तालुका बार असोसिएशन.

सिन्नर येथे वरिष्ठ स्तर न्यायालय व्हावे, अशी वकिलांसह नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. आता वैशिष्ट्यपूर्ण निधीतून सुसज्ज आणि देखणी इमारत उभी करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. – माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर.

हेही वाचा:

Back to top button