पुणेः पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस दलातील दोघा पोलिस कर्मचार्यांना अपर पोलिस आयुक्त प्रशासन यांनी तीन वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादात एका महिला पोलिस कर्मचार्याने मित्र असलेल्या दुसर्या पोलिस कर्मचार्याला आपल्या ओढनीने गुंडाळून पेट्रोल ओतून स्वत:सह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकाराची चौकशी सुरू होती. चौकशीअंती दोघांनी केलेले कृत्य हे गंभीर स्वरूपाचे, नैतिक अधपतनाचे तसेच पोलिस दलास अशोभनिय बेशिस्त असे गैरवर्तन असल्याचे समोर आल्याने दोघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 जून 2022 रोजी दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. संबंधीत महिला पोलिस कर्मचारी ह्या त्यावेळी दत्तवाडी पोलिस ठाण्यात तर त्यांचा मित्र पोलिस कर्मचारी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. महिला पोलिस कर्मचार्यांनी दिवसपाळी ड्युटीवर हजर असताना, कर्तव्यावर गैरहजर राहून कोणाचीही परवानगी न घेता मित्र पोलिस कर्मचार्याला येथील सैनिकी वस्तीगृहाजवळील सार्वजनिक ठिकाणी बोलावून घेतले. तेथे दोघात प्रेमसंबंधातून वाद झाला.
त्यावेळी महिला पोलिस कर्मचार्याने स्वतःसह मित्राला आपल्या ओढणीमध्ये गुंडाळले. त्यानंतर दोघांच्या अंगावर पेट्रोल टाकून काडीपेटीने आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी महिलेच्या मित्राने दत्तवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत झालेला प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना सांगितला. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचार्यांचे दत्तवाडी पोलिसांनी जबाब नोंदविला होता. दरम्यान या घटनेची अपर पोलिस आयुक्तांकडे चौकशी सुरू होती. पोलिस दलास अशोभनीय बेशिस्त असे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत दोघांना तीन वर्ष वेतनवाढीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.