शिर्डीत पावसाचा हाहाकार....! जनजीवन विस्कळीत | पुढारी

शिर्डीत पावसाचा हाहाकार....! जनजीवन विस्कळीत

 शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्री गणेशाचे आगमन आणि दडी मारलेल्या पावसाच्या दमदार हजेरी मुळे साईनाथांची शिर्डी जलमय झाली, त्यामुळे शिर्डीकरांचे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले. तर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, तर लक्ष्मीनगरच्या ओढ्याचे पाणी नागरिकांचे घरात घुसले, त्यामुळे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शिर्डीत पावसाने चांगलाच हाहाकार माजवला. त्यामुळे शिर्डीकर चांगलेच धास्तावले आहे. शिर्डीत श्री. गणेशाची काल बुधवारी चांगलीच धामधूम होती. त्यामुळे एक उत्साह साई भक्त व ग्रामस्थांमध्ये होता. त्यानंतर १० वाजेच्या सुमारास पावसाने अचानक रौद्र रूप धारण केले. आणि पाहता पाहता शिर्डी जलमय होऊ लागली.

शिर्डीतला श्रीरामनगर, शिवजीनगरचा काही भाग, लक्ष्मीनगर, दत्तनगर, बिरोबा बन हा पूर्णपणे जलमय बनला. त्यानंतर एरव्ही पाण्याने कोरडा असणारा लक्ष्मीनगरचा ओढा पाण्याने वाहू लागला. लक्ष्मीनगरच्या ओढ्यालगत असणाऱ्या घरात पाणी नाचू लागले. या पाण्याने अक्षरशः गरीबांच्या घरातील दाणादिन उडवली. तीच अवस्था आंबेडकरनगर, श्रीरामनगर तर शिवाजीनगरच्या भागात पहावयास मिळाली.

तर गरिबांचे रुग्णालय असलेले साईनाथ रुग्णालय अक्षरशः जलमय झाले आहे. शिर्डी शहराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या कणकुरी भागात अतिवृष्टी झाली होती. त्याचे ओव्हर फ्लोचे पाणी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरू झाले. त्यामुळे गुरुवारी एकच धावपळ सुरू झाली. पाहता पाहता अख्खा खालचा भाग पाण्याने व्यापला गेला. काही रुग्णांना साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. शेवटचे वृत्त घेईपर्यंत पाण्याचा प्रवाह तितकाच जोरात होता. त्यामुळे किमान दिवस हा जोर कमी होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

संबंधित बातम्या

दुसरीकडे साई बाबांचे भोजनालय जलमय झाले आहे.त्यामुळे सकाळी १० वाजेपासून भाविक पाण्यात मार्ग काढत प्रसाद घेण्यासाठी जात आहे. तर महावितरण मुख्य फेडरही पाण्यात गेलं आहे. पोलिसांचे विश्रामगृह व शासकीय विश्रामगृह पाण्यात बुडाले आहे. कोपरगाव नाका ते विश्रामगृहपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती.

शिर्डी परिसर व निमगाव परिसरात असणाऱ्या शेतात खच्च पाणी साचेल आहे, त्यामुळे शेकडो हेक्टर शेतीची नासधूस झाली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था पोहचल्या आहेत. तर काही ठिकाणी अजून या यंत्रणा पोहचू शकल्या नाहीत. तर काही ठिकाणी पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सर्व सामान्य मात्र जेरीस आला आहे.

Back to top button