नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती पिकांचे नुकसान | पुढारी

नाशिक : श्रीपूरवडेत ढगफुटीसदृश पर्जन्यवृष्टी; शेती पिकांचे नुकसान

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील मोसम खोर्‍यात सोमवारी (दि. 8) सायंकाळी विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. श्रीपूरवडे परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे नदी, ओहोळ, नाल्यांच्या काठावरील शेतीचे अपरिमित नुकसान झाले. मंगळवारी (दि. 9) मोहरमची सुटी असूनही महसूल विभागाकडून पाहणी व पंचनामे केले जात होते.

तालुक्यात सोमवारी (दि. 8)दुपारनंतर सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली. मोसम खोर्‍याला अक्षरश: झोडपून काढले. श्रीपूरवडे, टिंगरी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. टिंगरी येथे उगम पावून श्रीपूरवडेजवळून वाहणार्‍या भिवरा नदीस प्रचंड पूरपाणी आले. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 1969 नंतर गेल्या 50 वर्षांत प्रथमच नदीला असा पूर गेला. नदीकाठावरील शेती पिकांसह वाहून गेली. घरांमध्येही पाणी शिरले. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचार्‍यांसोबत मंगळवारी (दि. 9) श्रीपूरवडे परिसराची पाहणी केली. यावेळी कर्मचार्‍यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामेही केले. मंगळवारी दिवसभर श्रीपूरवडे परिसरातील नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू होती.

ब्राह्मणपाडे परिसरातही ढगफुटी…

मोसम खोर्‍यातीलच ब्राह्मणपाडे परिसरातही ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे बेळ्या डोंगरावरून उगम पावणार्‍या पिंपळ्या नाल्यास विक्रमी पूरपाणी वाहिले. त्यामुळे भउरदर शिवारात नाल्याच्या दोन्ही काठांवरील जवळपास 30 एकरहून अधिक शेती पिकांसह वाहून गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. नाल्याच्या दोन्ही काठांवरील पिकांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष हर्षल अहिरे व ग्रामस्थांनी केली आहे.

किकवारीतील शेती पाण्यात… 
किकवारी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पारंबा शिवारातील शेती पिकांमध्ये महिनाभरापासून पाणी साचले आहे. डोंगर उताराकडील या भागात खोलगट शेतांमध्ये उंचावरील शेतातील पाण्याचा निचरा होऊन ते साचले आहे. त्यामुळे पिके अक्षरशः सडली असून, पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 9) तलाठी भोये यांनी या परिसरात जाऊन पंचनामे सुरू केले आहेत.

बागलाणमध्ये सोमवारी मंडळनिहाय झालेला पाऊस असा: सटाणा 29.40 मिमी, ब्राह्मणगाव 30.00 मिमी, विरगाव 22.00 मिमी, नामपूर 42.00 मिमी, मुल्हेर 38.00 मिमी, ताहाराबाद 55. 00 मिमी, डांगसौंदाणे 23.00 मिमी, जायखेडा 64.00 मिमी.

हेही वाचा:

Back to top button