कांद्यात असतात ‘हे’ आरोग्यदायी गुणधर्म | पुढारी

कांद्यात असतात ‘हे’ आरोग्यदायी गुणधर्म

नवी दिल्ली : भारतीय जेवणात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. ‘कांदा-भाकर’ हे अगदी गरिबांचेही अन्न आहे. कांदा केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही चांगला असतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कांद्यात अनेक जीवनसत्त्वे व पोषक घटक असतात. त्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी लाभ होतो.

कांद्यातील कार्बनिक सल्फर शारीरिक कार्यप्रणालीसाठी महत्त्वाचा आहे. हा घटक शरीरातील कोलेस्टेरॉल घटवण्यासाठीही मदत करतो. त्यामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. कांदा हा उत्तम अँटिबॅक्टेरियल असून तो धोकादायक जीवाणूशीही लढू शकतो असे मानले जाते. ई कोलाई, स्यूडोमोनास एरुगिनोसा, स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि बॅसिलस सेरेससारख्या जीवाणूंविरुद्ध कांदा प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचा घटक असतो जो जीवाणूविरुद्ध प्रभावी ठरतो. त्यामुळे कांद्याचे नियमित सेवन आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरू शकते.

कांद्यामध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि सूज व ट्राग्लिसराईडस्चा स्तर कमी करणारे घटक असतात. ‘क्वेरसेटिन’ हे एक ‘फ्लेवोनोईड अँटिऑक्सिडंट’ आहे. ते शक्तिशाली अँटिइन्फ्लेमेटरी असते. कांद्याचे सेवन हे मधुमेहाच्या रुग्णांनाही लाभदायक असल्याचे दिसून आले आहे. केसांच्या आरोग्यासाठीही कांदा गुणकारी आहे.

Back to top button