नगर : पुढारी वृत्तसेवा: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी मृग नक्षत्राने शनिवारी सर्वदूर कमी -अधिक प्रमाणात हजेरी लावली. पाथर्डी, नगर, शेवगाव, जामखेड, राहुरी या चार तालुक्यांत दमदार पावसाची नोंद झाली. नगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडलात सर्वाधिक 140 मि.मी., तर पाथर्डी तालुक्यातील मिरी मंडलात 80 मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पेरणीला वेग येणार आहे.
बुधवारी मृग नक्षत्राचे आगमन झाले. पहिल्याच दिवशी या नक्षत्राने पारनेर, नगर, श्रीगोंदा, जामखेड व संगमनेर तालुक्यांंत हजेरी लावली. त्यामुळे या तालुक्यांतील बहुतांश गावांतील शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यानंतर शनिवारी देखील नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, राहुरी या चार तालुक्यांत मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावली. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग पेरते झाले आहेत.
नगर तालुक्यातील जेऊर मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली.तब्बल 140 मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सीना नदी वाहती झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
गेल्या पाच दिवसांत मृग नक्षत्राने नगर, जामखेड या तालुक्यांत जोरदार हजेरी लावीत या तालुक्यांत खरीप पेरणीचे वातावरण निर्माण केले आहे. शनिवारी जिल्ह्यातील 40 महसूल मंडलांत पाच मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नगर, पारनेर तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांतील टँकर बंद होण्याची शक्यता वाढली आहे.