बीड : महातपुरी येथे दोन मावस बहिणींचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू | पुढारी

बीड : महातपुरी येथे दोन मावस बहिणींचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू

माजलगाव (बीड); प्रतिनिधी : तालुक्यातील महातपुरी येथे काका मावशीकडे आलेल्या दोन मावस बहिणींचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाला. नदीपात्रात वाळूमाफियांकडून खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी ९ च्या सुमारास घडली.

माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील लक्ष्मण रामभाऊ शिंगाडे आणि सोमेश्वर रामभाऊ शिंगाडे यांच्याकडे दिपाली गंगाधर बरवडे (वय २०, रा.मन्यारवाडी, ता.गेवराई) आणि स्वाती अरुण चव्हाण (वय १२, रा. आनंदवाडी, ता.परतुर, जि.जालना) या दोघी मावसबहिणी काका मावशीकडे काही दिवसांपूर्वी राहण्यास आल्या होत्या.

शुक्रवारी महातपुरी गावालगत असलेल्या गोदावरीनदी पात्रात दोघी आपल्या मावशी सोबत कपडे धुण्यासाठी सकाळी ९ वाजता गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर वाळू माफियांनी गोदापात्रात रस्ता केला होता. त्या पाण्यातील रस्त्याने दोघी बहिणी चालत निघाल्या. तेथून जात असताना वाळूसाठी खणलेला खड्‍ड्यात स्वाती पाय घसरुन पडली. खड्डा खोल असल्याने त्या पाण्यात स्वाती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दिपाली त्या पाण्यातील खड्ड्यात गेली. पण, घाबरलेल्या स्वातीने दिपालीला घट्ट मिठ्ठी मारली. यामुळे दोघींना काहिच हालचाल करता येईना. यामुळे दोघी पाण्यात बुडाल्या. यावेळी गोदापात्रात इतर महिलांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला.

तेथे पोहणाऱ्या व गावातील नागरिकांनी दोघींचा शोध घेतला पण, त्यांना दोघींचा शोध लागण्यास थोडा वेळ लागला. बुडालेल्या दोघींचा शोध लागल्यावर त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तसेच दोघींना तातडीने माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टारांनी दोघी मावस बहिणींना मृत घोषित केले. या दोन्ही मावस बहिणीचा मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button