पुणे : निकृष्ट कामामुळे सांगवीतील पूल कोसळण्याचा धोका

सांगवी येथील याच पुलाचे काम निकृष्ट झाले आहे.
सांगवी येथील याच पुलाचे काम निकृष्ट झाले आहे.

अनिल तावरे

सांगवी : बारामती तालुक्यातील विकासकामांच्या दर्जाबद्दल तडजोड केली जात नसल्याचे बोलले जाते; मात्र सांगवी येथे पूर नियंत्रण योजनेतून उभारलेल्या ओढ्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. परिणामी तळीरामाचा धक्का लागला तरी पुलाचे खांब पडत आहे. यावरून भविष्यात पूल कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली; मात्र संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांतच हा पूल कोसळण्याची शक्यता असल्याने दर्जाबाबत तडजोड न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: या पुलाची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

सांगवीवरून कांबळेश्वरला जाण्यासाठीच्या जुन्या रस्त्यावर सांगवी गावाशेजारीच मोठा ओढा आहे. निरा नदीला महापूर आल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागतो. दोन्ही गावातील नागरिकांची पावसाळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांनी पूर नियंत्रण योजनेतून सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने या पुलाचे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहे.

लवकरच पाहाणी करणार

या पुलाच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल पवार यांच्याशी संपर्क साधला सांगवी ग्रामपंचायतीचा तक्रारअर्ज मिळाला असून लवकरच संबंधित पुलाची पाहणी करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदाराचा उद्योग

  • काम चालू असतानाच केलेल्या बांधकामाला मोठमोठ्या दगडांचा आधार द्यावा लागला.
  • संरक्षक कठड्यांना चालू कामातच तडे गेले.
  • सांगवी ग्रामपंचायतीने केलेल्या भूमिगत गटार योजनेच्या चेंबरची दुरुस्ती न करताच त्यावर मुरमाचे ढिगारे टाकले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news