पणजी : मोबाईल चोरणारी महाराष्ट्रातील टोळी गोव्यात जेरबंद, ३० लाखांचे ४१ आयफोन जप्त

पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन. सोबत उपअधीक्षक विश्वेश कर्पे. (छायाः विठ्ठल गावडे पारवाडकर)
पणजी : पत्रकार परिषदेत बोलताना क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन. सोबत उपअधीक्षक विश्वेश कर्पे. (छायाः विठ्ठल गावडे पारवाडकर)
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा; गोव्यातील पर्यटकांचे महागडे फोन चोरण्याच्या उद्देशाने गोव्यात दाखल झालेल्या १२ जणांची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून तब्बल ३० लाखांचे ४१ आयफोन जप्त करण्यात आले आहेत. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी पणजी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक विश्वेश कर्पे उपस्थित होते.

वाल्सन म्हणाले, बुधवारी २८ रोजी पुणे येथील जितेश मेहता यांनी कळंगुट पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा महागडा मोबाईल कळंगुट येथे एका चोरट्याने हिसकावून घेऊन पोबारा केला. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कळंगुट बागा येथे एका हॉटेलात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यासोबत अन्य काहीजण असल्याचे दिसून येताच कळंगुट पोलिस पथकाने रात्री बागा व कळंगुट येथील दोन हॉटेलवर छापा टाकून संशयितांना अटक केली. दोन्ही हॉटेलमध्ये मिळून १२ चोरटे होते. यावेळी तक्रारदाराचा मोबाईल सापडला.

तपासात असे कळून आले की, हे १२ संशयित महागडे मोबाईल चोरी करण्यासाठी गोव्यात आले होते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे ४१ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. त्यांची किंमत ३० लाखांच्या आसपास होते. त्यांच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचा ८ ग्रॅम एमएमडी हा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी त्यांची इनोव्हा कारही जप्त केली.

गोव्यामध्ये पर्यटकांना टार्गेट करून विशेषत: त्यांचे महागडे फोन चोरी करण्याच्या उद्देशाने ही बारा जणांची टोळी गोव्यात दाखल झालेली होती. गुरुवार व शुक्रवारी ते वागातोर येथे सुरू असणार्‍या सनबर्न संगीत महोत्सवामध्ये सहभागी होणार होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन तिकीटे काढली होती. तेथे सहभागी झालेल्यांचे मोबाईल चोरण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना अटक केली.

मोबाईल कुठले याचा तपास सुरू

चोरट्याकडे सापडलेले ४१ मोबाईल गोव्यातीलच की अन्यत्र चोरलेले आहेत, याचा तपास पोलिस घेत आहेत. या चोरट्यांचा अमली पदार्थ व्यावहाराशी सबंध आहे का? तसेच त्यांच्या नावावर महाराष्ट्रात गुन्हे नोंद आहेत का? याचा शोध घेतला जात असल्याचे वाल्सन यांनी सांगितले.

दहा पथके तैनात

राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांची १० विशेष पथके राज्यातील महत्त्वाच्या भागात साध्या वेषात तैनात केली आहेत. यात पोलिस, गुन्हा अन्वेषण व अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे, असे वाल्सन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

परवाने घेऊन संगीत पार्टी

राज्यांमध्ये नववर्षाच्या रात्री रात्रभर संगीत पार्टी आयोजनाचे काही लोकांनी परवाने घेतले आहेत. त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. परवाने न घेता संगीत पार्टी आयोजित केल्यास कारवाई होणार आहे, अशी माहिती वाल्सन यांनी दिली.

३ लाखांचे ड्रग्ज जप्त

बार्देश तालुक्यातील हणजूण येथे गुन्हे अन्वेषण पोलिसांनी बुधवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ३ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी अजित पांडुरंग कांबळी (रा. हणजूण) याला अटक करण्यात आली आहे. अजित कांबळी याने प्लास्टिक पिशवीतून आणलेला चरस विकण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५०५ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याचे वाल्सन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news