Latest
Chandrayaan 3 : पुण्यात साकारला चंद्रयानाचा देखावा; श्री सोमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
बाणेर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाषाण परिसरातील सोमेश्वर वाडी येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या गाभार्यात दुसर्या श्रावणी सोमवारनिमित्त 'मिशन चंद्रयान-3'चा देखावा साकारण्यात आला होता. तसेच देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. मंदिर परिसरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. भारताचे 'चंद्रयान -3' गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या चंद्रावर पोहोचले. या मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर मंदिराच्या गाभार्यात चंद्रयानाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या देखाव्याचे कौतुक केले तसेच परिसरात या देखाव्याची चर्चा सुरू होती.
श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला या मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. या मंदिराला एक वेगळाच इतिहास आहे. एका गुराख्याने बांधलेल्या या छोटेखानी मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्रींनी 1708 ते 1749 या कालावधीत बांधल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मुख्य मंदिराचा मंडप शिवरामभाऊ यांनी 1780 मध्ये बांधला. छोट्या शिवबांसह राजमाता जिजाऊ यांचे वास्तव्य पुण्यात असताना त्या या मंदिरात दर्शनाला येत असत. त्यामुळे या परिसराला 'जिजापूर' असेही संबोधले जाई, असा संदर्भही या देवस्थानाला आहे.
काही वर्षांपूर्वी मंदिराचे विश्वस्त व माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना या ठिकाणी मिळतो तसेच मंदिराशेजारी असलेल्या कै. संजय महादेव निम्हण ग्राम संस्कृती उद्यानात 'बारा बलुतेदार' ही ग्रामीण पद्धतही साकरण्यात आली आहे. हे उद्यान पाहण्याचा आनंदही येथे येणारे नागरिक घेत असल्याचे देवस्थानच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
श्रावणी सोमवारनिमित्त देवस्थानच्या वतीने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पूजा, अभिषेक, भजन यासह भाविकांना महाप्रसादाचे वाटपही करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.-पोपटराव जाधव, अध्यक्ष,श्री सोमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट.
हेही वाचा

