

महाबळेश्वर ; पुढारी वृत्तसेवा
केटस् पॉईंट येथे एका माकडाने पर्यटक महिलेची पर्स हिसकावून घेतली. या पर्समध्ये खाण्याची कोणतीही वस्तू नसल्याने माकडाने ती पर्स दरीत भिरकावून दिली.
या पर्समध्ये महत्त्वाची कागदपत्रे व पैसे होते. याची माहिती पर्यटक कुटुंबीयांनी वन विभागाचे कर्मचारी संतोष भिलारे व सचिन कांबळे यांना दिली. यानंतर त्यांनी दरीमध्ये उतरत ही पर्स काढून दिली. ब्रिजेश दळवी हे कुटुंबीय अमरावतीहून महाबळेश्वरला आले होते. पर्स परत मिळाल्याने त्यांनी कर्मचार्यांचे आभार मानले.
बऱ्याच ठिकाणी पर्यटकांकडून माकडांना वेफर्स, बिस्किटे, शेंगदाणे, केळी, फळे यासारखे खाद्य पदार्थ खाण्यासाठी दिले जातात. यामुळे ही माकडेही पर्यटकांच्या हातातील वस्तूंवर लक्ष ठेवून असतात. अशावेळी महिलांच्या हातातील पर्स, पिशव्यांमध्ये काहीतरी खायाला मिळेल या भावनेने माकडांकडून पर्यटकांकडील पर्स, पिशव्या हिसकावण्याचे प्रकार घडतात. तेंव्हा पर्यटक नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.