

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून एका 38 वर्षीय महिलेस नाष्ट्यातून गुंगीचे औषध ओळखीच्या एका इसमाने देऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारातून जन्मलेल्या मुलीला बापाचे नाव लावण्यासाठी आरोपीने 20 लाखांची मागणी करून 12 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्यावर खंडणी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वडगाव शेरीतील 40 वर्षीय इसमाला अटक केली आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी ते 19 जून 2023 यादरम्यान खराडी परिसरात घडला. आरोपीने पीडित महिलेला 'आपण लग्न करू'असे सांगून तिचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तिला नाष्ट्यात गुंगीसारखे औषध देऊन ती गुंगीत असताना तिच्याशी शरीरसंबंध केला. या संबंधाचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी त्याने तिला दिली. त्याने केलेल्या अत्याचारामुळे महिला गरोदर राहिली. त्यातून तिने मुलीला जन्म दिला.
त्या वेळी आरोपीने तिचे ससून हॉस्पिटल येथील जन्माच्या कागदपत्रावर त्याचे स्वत:चे नाव न लावता, पीडितेच्या वडिलांचे नाव लावले. तसेच त्याला मुलीचे नाव लावण्याकरिता महिलेने विनवणी केली असता, आरोपीने महिलेला 20 लाख रुपये दे तरच मी माझे नाव मुलीचे नावासमोर लावतो असे सांगितले. यासाठी महिलेने बँकेचे कर्ज काढून व त्याचे खात्यावर रोख स्वरूपात एकूण 12 लाख रुपये भरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहे.
हे ही वाचा :