त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण भडकवणाऱ्यांना थारा न दिल्याबद्दल आभार : हुसेन दलवाई 

त्र्यंबकेश्वरमध्ये वातावरण भडकवणाऱ्यांना थारा न दिल्याबद्दल आभार : हुसेन दलवाई 
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर येथील कथित मंदिर प्रवेशाच्या घटनेतील सय्यद परिवाराची हुसेन दलवाई यांनी भेट घेत शांत राहण्याचे आणि कोणाच्याही भडकवणाऱ्या कृत्याला बळी न पडण्याचा तसेच त्र्यंबकची शांतता अबाधित ठेवण्यास मदत करण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक नागरिकांनी शांतता अबाधित ठेवताना बाहेरून आलेल्या भडकवणाऱ्या व्यक्तींना दाद दिली नाही आणि एकोपा कायम राखल्याबद्दल स्थानिकांचे आभार मानले.

त्र्यंबकमधील मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेप्रकरणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी शहराला भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी त्यांनी नव्याने कोणताही वाद उद्भवू नये म्हणून स्वत: मंदिराला लांबूनच बाहेरूनच भेट देत त्र्यंबकराजाला अभिवादन केले. मंदिराबाहेर असलेल्या 'हिंदूंशिवाय प्रवेश नाही' या फलकाचा उल्लेख करून आपण लांबूनच दर्शन घेत असल्याचे म्हटले. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे राहत त्यांनी हात जोडले आणि स्वत:च्या मोबाइलने छायाचित्र घेतले. यावेळेस तेथे असलेल्या सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. त्यांनी आडवे उभे राहून प्रवेशद्वार अडवले. यावर दलवाई यांनी मी येथूनच हात जोडत आहे, मी आत जाणार नाही. तसेच मी तुमचे फोटो काढत नाही, असेही स्पष्ट करत त्यांना दिलासा दिला. आतील चित्र मोबाइलवर झूम करत सुंदर आहे, असे गौरवोदगारही त्यांनी यावेळी काढले.

मंदिराबाबत सर्वांना आस्था

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमधील मुस्लीम बांधवांनी संदल मिरवणूक काढली व त्र्यंबकेश्वरास प्रवेशद्वारी धूप दाखवला. यामध्ये ते त्र्यंबकराजाचा आदर करतात, असे दिसून आले. यामध्ये काय चुकले? त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत आस्था असल्याने ते धूप दाखवण्यासाठी थांबले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक नागरिकांनी शांततेला प्राधान्य देताना बाहेरून वातावरण भडकविण्यासाठी आलेल्या व्यक्तींना दाद दिली नाही, याबद्दल आपण स्थानिकांचे अभिनंदन करत आहे, असे स्पष्ट केले.

गावोगावी पिराचा संदल आणि ग्रामदेवता यांचे उत्सव करताना सर्वधर्माचे लोक दर्शन घेतात. याबाबत त्यांनी स्वतःच्या गावातील होणाऱ्या उत्सवांचा दाखला दिला. आपल्या देशाची संस्कृती गंगा-जमुना सभ्यतेची आहे. मात्र, देशातील आणि विशेषत: राज्यातील 10 ते 12 संघटना मोर्चे काढत आहेत. अविचारी आणि अविवेकी भाषा करत आहेत. या संघटनांची चौकशी सरकारने करावी. त्यांना निधी कोणाकडून मिळतो, याचा तपास करण्याची मागणी केली. दंगे घडवू पाहणाऱ्यांना त्र्यंबकवासीयांनी थारा दिला नाही. तसेच त्र्यंबकवासीय येथील सय्यद कुटुंबाच्या मागे उभे असल्याचे पाहून समाधान वाटले, असे ते म्हणाले.

यावेळेस त्यांच्या समवेत नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, दिनेश पाटील, रोहित सकाळे, हरिभाऊ अंबापुरे यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

सय्यद कुटुंबाला मोलाचा सल्ला

दरम्यान, गुलाबशाह वली बाबा दर्गा येथे भेट देत दलवाई यांनी तेथील सय्यद कुटुंबातील सकलीन, अरमान, नईम या युवकांशी चर्चा केली. त्यांना शांत राहण्याचे आणि कोणाच्याही भडकवणाऱ्या कृत्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला. तसेच त्र्यंबकेश्वरचे नागरिक तुमच्या पाठीशी आहेत याचे भान ठेवा आणि शांतता अबाधित ठेवण्यास मदत करा, असा सल्लाही त्यांनी आवर्जून दिला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news