

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: ठाण्यातील हिरानंदानी भागात असलेल्या मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यावेळी सदर बंगल्यात एकाच परिवारातील पाच जण अडकले होते. त्यापैकी तीन जण सुखरूप आगीच्या बाहेर पडले तर घरातील दोन जणांना आगीचा त्रास होऊ लागल्याने ते बेशुद्ध पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना आगीतून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. अभिमन्यू मढवी (60) आणि रमाबाई मढवी (55) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. (Thane fire incidence)
शनिवारी पहाटे 3.20 वाजेच्या सुमारास हिरानंदानी इस्टेट रोड, वाघबीळ, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी मढवी निवास या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत घरातील पाच अडकले होते. त्यापैकी प्रणाली मढवी (30), कविश मढवी (13), पलाश मढवी (12) हे तिघेही घरातून सुखरूप बाहेर पडले. मात्र, घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपलेले अभिमन्यू व रमाबाई मढवी हे दाम्पत्य आगीत अडकले होते. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना आगीतून बाहेर काढले. परंतु धूर व आगीमुळे दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यांना नजीकच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मयत घोषित केले. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली. (Thane fire incidence)