

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत दहशत माजवण्याचा दहशतवाद्यांचा कट उघडकीस आला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी (दि.१२) जहांगीरपुरीतील भालस्वा डेअरीमधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर आता आणखी चार संशयित दहशतवादी भारतात राहत असल्याचा संशय आला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने या संशयितांचा शोध सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ दहशतवाद्या व्यतिरिक्त इतर चार संशयित दहशतवादी देखील सक्रीय आहेत. त्यांनी ड्रॉप-डेड पद्धतीने पाकिस्तानातून शस्त्रे मिळवली आहेत. ते सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून सीमेच्या पलीकडे असलेल्या त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात आहेत. उत्तराखंडमधील अज्ञातस्थळी त्यांच्याकडे शस्त्रे सापडली असून त्याची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
जहांगीरपुरी भागातील भालस्वा डेअरीमधून अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांकडून दिल्ली पोलिसांना ही माहिती मिळाली. हे संशयित दहशतवादी वेगवेगळ्या राज्यात लक्ष्य करून हल्ले करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा संशयित दहशतवादी वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकांना लक्ष्य करून हल्ले करण्याच्या तयारीत होता. तसेच सीमेपलीकडील त्याच्या बॉसने त्याच्याकडे हे काम सोपवले असून सिग्नल अॅपद्वारे तो सतत त्यांच्या संपर्कात असायचा.
हेही वाचलंत का ?