Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रशिया-बेलारूसच्या ध्वजांवर बंदी | पुढारी

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रशिया-बेलारूसच्या ध्वजांवर बंदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Australian Open : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनवर झाला आहे. मेलबर्न पार्कमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत रशिया आणि बेलारूसच्या ध्वजांवर बंदी घालण्यात आली आहे. युक्रेन राजदूतांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी 2022 पासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. रशिया आणि बेलारूसला या युद्धासंदर्भात अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर अशा प्रकारच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) सोमवारी रशियाची टेनिस स्टार कमिला राखिमोवा आणि युक्रेनची कॅटरिना बँडेल यांच्यात सामना झाला. या सामन्यात युक्रेनसह रशियाच्या समर्थकांनीही आपले झेंडे आणले होते. या सामन्याशी संबंधित एक फोटो युक्रेनचे राजदूत वासिल मायरोश्निचेन्को यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये टेनिस कोर्टसमोरील गर्दीत एका चाहत्याच्या हातात रशियाचा ध्वज दिसत आहे. युक्रेनच्या राजदूतांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी रशिया आणि बेलारूसच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आली.

 

युक्रेनचे राजदूत मायरोश्निचेन्को यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करून निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणला की, ‘आज ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये युक्रेनियन टेनिसपटू कॅटेरीना बँडेलच्या खेळादरम्यान रशियन ध्वजाच्या सार्वजनिक प्रदर्शनाचा मी तीव्र निषेध करतो, मी ऑस्ट्रेलियन टेनिस फेडरेशनला रशियाच्या ध्वजाच्या वापरावर निलंबनाची कारवाई करण्याची विनंती करतो. त्यांनी या ध्वजावर बंदी घालावी अशी माझी मागणी आहे.’ या तक्रारीची दखल घेत टेनिस ऑस्ट्रेलियाने मंगळवारी रशिया आणि बेलारुस या दोन्ही देशांच्या ध्वजांवर बंदी घातली. (Australian Open)

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून रशिया आणि बेलारूसचे खेळाडू टेनिससह अनेक खेळांमध्ये आपल्या देशाचे झेंडे घेऊन जाऊ शकलेले नाहीत. दोन्ही देशांचे खेळाडू पांढरा झेंडा घेऊन ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होत आहेत. तर विम्बल्डन 2022 मध्ये खेळण्यासही बंदी घालण्यात आली होती.

युक्रेनियन कॅटरिनाची रशियन कमिलावर मात

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) महिला एकेरीच्या पहिल्या फेरीदरम्यान युक्रेनची कॅटेरिना आणि रशियाची कमिला राखिमोवा यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कॅटरिनाने दमदार कामगिरी करत हा सामना 7-5, 6-7, 6-1 असा जिंकला. सामन्यात सुरुवातीपासूनच कॅटरिनाचे पारडे जड होते. पण दुसरा सेट तिला गमवावा लागला. तिस-या सेटमध्ये कॅटरिनाने जोरदार पुनरागमन केले आणि हा सेट सहज जिंकला. याचबरोबर दोन तास 52 मिनिटे चाललेला हा खिशात टाकला आणि पुढची फेरी गाठली.

Back to top button