ट्विटर खरेदीसाठी एलन मस्क यांनी विकले टेस्लाचे स्टॉक; शेअर्सच्या किंमतीत घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटर खरेदी करण्यासाठी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी टेस्ला या इलेक्ट्रिक कंपनीचे सुमारे ४ अब्ज डॉलर किंमतीचे शेअर्स विकले आहेत, अशी माहिती एसईसी फाइलिंग्समधून समोर आली आहे. ट्विटर खरेदीसाठी मस्क यांनी टेस्लाचे स्टॉक विक्री केल्याने, टेस्लाची शेअरची किंमत घसरत आहे. मस्क यांच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांंमध्ये नाराजी दिसून येत आहे. टेस्लाच्या स्टॉकमधील विक्रीमुळे टेस्लाच्या शेअर्स किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी ट्विटरचे ४४ अब्ज डॉलरचे शेअर्स खरेदी करून ट्विटरचा ताबा घेतला होता. यानंतरच्या मोठ्या डिलनंतर मस्क यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की, मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी त्याच्या पहिल्या कंपनीचे म्हणजेच टेस्लाचे स्टॉक आणि शेअर्स विकले आहेत. यामध्ये ३.९ अब्ज डॉलर किंमतीचे १ कोटी ९० लाख इतके स्टॉक आणि शेअर्स एलन मस्क यांनी विकले असल्याचे या कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे. या शेअर्सची सध्याची किंमत ३.९५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. तर भारतीय चलनानुसार ही किंमत ३२.५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
ट्विटरला शेअर बाजारातून बाहेर काढण्याच्या मस्कच्या निर्णयामुळे ट्विटरमध्ये त्वरीत मोठे बदल करण्याची परवानगी मस्क यांना मिळाली आहे. परंतु यामुळे कंपनीला अधिक कर्जात टाकले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या कंपनीत शेअर्स असणाऱ्या व्यवसायिकांना पैसे गमावण्याचा धोका निर्णाण झाला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रभावी सोशल मीडिया कंपनी ट्विटर यांच्यातील वादानंतर मस्क यांनी ट्विटरचे शेअर्स खरेदी करत, ट्विटरचा ताबा घेतला. यानंतर एलन मस्क यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत, नोकरकपातीचाही मोठा निर्णय घेतला. मात्र यानंतर मस्क यांनी किर्मचाऱ्यांना विनंती करत कामावर पुन्हा येण्याचे आवाहन केले आहे.