स्मार्टफोनच्या अतिवापराने देशातील ३७.१५ टक्के मुलांच्या एकाग्रतेवर थेट परिणाम ! | पुढारी

स्मार्टफोनच्या अतिवापराने देशातील ३७.१५ टक्के मुलांच्या एकाग्रतेवर थेट परिणाम !

पुढारी ऑनलाईन डेस्क : डिजीटल युगात इंटरनेट ॲक्सेस सहज उपलब्ध झाल्यामुळे स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मनोरंजन असाे की व्हिडीओ गेम्स यासाठी स्मार्टफोनचा वापर हाेत हाेताच काेराेनानंतर ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्‍यामुळे याच्‍या वापरात अधिक भर पडली. कोरोना संसर्ग काळात मुलांमध्‍ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून, त्‍यांच्‍या शारीरिक, मानसिकतेवर विपरित परिणाम हाेत आहे. यामुळे 37.15% मुलं आपली एकाग्रता गमावत आहेत.

यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, मंत्रालयाकडे मुलांमधील इंटरनेट व्यसनाबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुलांवर मोबाईल, फोन आणि इंटरनेट ॲक्सेससह इतर उपकरणांचा होणारा परिणाम (प्रभाव) या विषयावर अभ्यास केला आहे. यामध्ये शारीरिक, वर्तणूक आणि मानसिक-सामाजिक या घटकांचा अभ्यास केला आहे. स्मार्टफोनच्या अति वापरामुळे मुलांच्यातील एकाग्रता कमी झाल्याचा अनुभव शिक्षक आणि पालकांना येत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

या अभ्यासानुसार  23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी  तर 37.15 टक्के मुले वारंवार स्मार्टफोनचा वापर करत आहेत. स्मार्टफोनच्या  वाढलेल्या वापरामुळे मुलांच्या एकाग्रता पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच मुलांच्या डोळ्यांवरही स्क्रीनचा विपरित परिणाम होऊन त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवत आहेत.

मुलांचे स्मार्टफोनचे व्यसन कमी न झाल्यास त्यांच्या कल्पना क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मुलांची नैसर्गिक बुद्धिमत्ता कमी होऊन, आर्टीफीशिअल बुद्धिमत्ता फोफावेल, याची भीतीही तत्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे, याकडेही या अहवालात लक्ष वेधले आहे, असेही मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्‍हटलं आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button