Team India vs Left Arm Bowlers : डावखु-या गोलंदाजांनी उडवली टीम इंडियाची झोप! दिग्गज फलंदाजही हतबल

Team India vs Left Arm Bowlers : डावखु-या गोलंदाजांनी उडवली टीम इंडियाची झोप! दिग्गज फलंदाजही हतबल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India vs Left Arm Bowlers : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या मा-यापुढे अक्षरश: लोटांगण घातले. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव केवळ 117 धावांत गुंडाळला गेला, जो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात वनडे क्रिकेटमधील निच्चांकी धावसंख्या ठरली. कांगारूंने हे विजयी लक्ष्य एकही विकेट न गमावता अवघ्या 11 षटकांत पूर्ण केले.

या सामन्यात मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी चमत्कार केला. त्याने 8 षटकात 53 धावा देत 5 बळी घेतले. स्टार्कने शुभमन गिल (0), रोहित शर्मा (13), सूर्यकुमार यादव (0), केएल राहुल (9) आणि मोहम्मद सिराज (0) यांची विकेट घेतली. स्टार्कच्या धारदार गोलंदाजीसमोर भारतीय संघाची आघाडीची फळी पूर्णपणे फ्लॉप झाली. (Team India vs Left Arm Bowlers)

मिचेल स्टार्क विरुद्ध भारत

स्टार्कचे टीम इंडियाविरुद्धचे एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. त्याने भारताविरुद्ध केवळ 15 सामन्यांमध्ये 25 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन वेळा एका डावात पाच विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 2015 मध्ये मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने भारताविरुद्ध 10 षटकात 43 धावा देऊन 6 विकेट घेतल्या होत्या. आता विशाखापट्टणममध्ये त्याने 8 षटकात 53 धावा देत 5 बळी घेतले आहेत.

स्टार्कने भारतासाठी खूप अडचणी निर्माण केल्या आहेत. त्याने अनेकवेळा टीम इंडियाचे सलामीवीर आणि स्टार फलंदाजांना आपले बळी बनवले आहे. यामुळेच स्टार्कच्या आक्रमणापुढे टीम इंडिया बॅकफूटवर जाते.

भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये स्टार्कने रोहित शर्मा आणि शिखर धवनला 3-3 वेळा बाद केले आहे. शुबमन गिल, सूर्यकुमार यादव यांना 2-2 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. तर विराट कोहलीला माघारी धाडण्यात स्टार्कला एकदा यश आले आहे. म्हणजेच टॉप चार फलंदाज नेहमीच स्टार्कच्या टार्गेटवर असतात.

बोल्ट-शाहीन यांनीही टीम इंडियाचे मोडले कंबरडे (Team India vs Left Arm Bowlers)

टीम इंडिया केवळ स्टार्कविरुद्धच नाही तर वेगवान आणि स्विंगसह गोलंदाजी करणाऱ्या कोणत्याही डावखु-या गोलंदाजाविरुद्ध संघर्ष करताना दिसली आहे. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट यांनी अलीकडच्या काळात टीम इंडियाच्या फलंदाजांना खूप सतावले आहे.

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने भारताविरुद्ध 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने एकदा 5, तर एकवेळा 4 विकेट्स घेतल्या आहेत. 2019 मध्ये हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट झाला होता, त्यावेळी बोल्टने 10 षटकात 21 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. हा किवी गोलंदाज भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरची शिकार करण्यात यशस्वी झाला आहे. त्याने शिखर धवनला 5 वेळा, रोहित शर्माला 4 वेळा, विराट कोहलीला 3 वेळा वनडेत बाद केले आहे.

पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी भारताविरुद्ध फक्त एकच एकदिवसीय सामना खेळू शकला आहे. परंतु टी-20 मध्ये त्याने भारताविरुद्धच्या 3 सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. या तिन्ही विकेट 2021 च्या टी-20 विश्वचषक सामन्यात मिळाल्या, जेव्हा पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात शाहीन आफ्रिदीने केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेत टीम इंडियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news