

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, मात्र त्याची टीम इंडियामध्ये निवड होत नाही. याच मुद्यावरून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भडकला असून प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी या 23 वर्षीय युवा क्रिकेटरला योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करावी. तो फक्त संघातील निवडीसाठी किंवा थ्रोडाउन करण्यासाठी नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे.
क्रीडा वाहिनीशी बोलताना गंभीरने, प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना पृथ्वी (Prithvi Shaw) सारख्या युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, 'कोच कशासाठी आहेत? निवडकर्ते कशासाठी आहेत? ते फक्त खेळाडूंची निवड किंवा त्यांना उचलून बाहेर फेकण्यासाठी नाहीत. पृथ्वीकडे प्रतिभा आहे. त्याचे संगोपन झाले पाहिजे. तो कुठून आला आणि त्याच्याकडे असलेली आव्हाने देखील लक्षात घेणे अवश्यक आहे. त्यामुळे पृथ्वी सारख्या खेळाडूंना योग्य मार्गावर आणण्यासाठी निवडकर्ते, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाने चांगली योजना आखून खेळाचा दर्जा नेहमीच उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजे आहे.'
संघ व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन पृथ्वी शॉशी (Prithvi Shaw) चर्चा करायला हवी. व्यवस्थापनाचे काम केवळ खेळाडूंना सामन्यासाठी तयार करणे नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड असो किंवा राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, या सर्व उच्चपदस्थ लोकांनी त्याच्याशी बोलून काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत, असा सल्लाही गंभीरने दिला आहे.
पृथ्वी शॉ भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने 25 जुलै 2021 रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पृथ्वीने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 5 कसोटी सामने, 6 एकदिवसीय सामने आणि एक टी 20 सामना खेळला आहे. 9 कसोटी डावांमध्ये त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. याशिवाय, एकमेव टी 20 सामन्यात तो सलामीला आला आणि एकच चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.
पृथ्वी शॉने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 63 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 25.21 च्या सरासरीने आणि 147.45 च्या स्ट्राइक रेटने 1588 धावा फटकावल्या आहेत.