शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारतोफा थंडावल्या, उद्या मतदान

file photo
file photo
Published on
Updated on

नागपूर; पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारतोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या (दि. 30) सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. एकुण 22 उमेदवार या रिंगणात असले तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा साहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शांततेने निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आवाहन केले आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हय़ातील ४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २५० कर्मचारी जिल्हय़ात कार्यरत आहेत. अजनी रेल्वे स्थानकाजवळील सामुदायिक भवन येथे सुरक्षा भवन (स्ट्राँग रूम) उभारण्यात आले आहे. २ फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत

नागपूरची जागा कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ताकदीने प्रचारात उतरल्याचे दिसून आले. तर कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडविण्याचा निर्धार करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, सेनेचा उमेदवार बदलणे, पाठींब्यावरून झालेल्या राजकीय घडामोडी पाहता मविआत एकजूट पहायला मिळाली नसल्याने निकालाबाबतही अनिश्चितता आहे. जुनी पेन्शनचा विषय या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला आहे. भाजपने शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना उशिरा सर्मथन दिले. महाविकास आघाडीतही नागपूरच्या जागेवरून ओढाताण झाली. शेवटी ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. नागो गाणार ही जागा तिसऱ्यांदा जिंकतात की मविआचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यापैकी कुणी बाजी मारतो हे निकालात, दुसऱ्या पसंती क्रमातूनच उघड होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news