पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न | पुढारी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांनी याबाबत सर्वपक्षीय शहराध्यक्षांना निवेदन देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार न देण्याची मागणी केली आहे.  चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून उमेदवारीअर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी (दि. 28) विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. लेखी पत्र देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते. त्यांनी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाच्या दु:खातून अद्याप जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय हितचिंतक सावरलेले नाही. अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहिले पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. भूमिपुत्र म्हणून स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी शहरात गेले 35 वर्षे राजकारण-समाजकारणात योगदान दिले. पक्षीय जोडे बाजुला ठेवून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका ठेवली. त्यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीमुळेच तुमच्या-माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. अनेकांना महापालिका आणि पक्षांच्या माध्यमातून विविध महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली. हे विसरून चालणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

…तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कुटुंबीय दु:खात आहे. अशा परिस्थितीत आपल्या राजकीय जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या मार्गदर्शनाची आणि मदतीची परतफेड करण्याची ही वेळ आहे. कारण, केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, व्यावसायिक जीवनातही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून जगताप कुटुंबीयातील कोणत्याही उमदेवाराविरोधात विरोधकांनी आपला उमदेवार उभा करू नये, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र, निवडणूक झालीच तर चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल. तो विजयदेखील लाखाच्या फरकाने असेल. त्यासाठी चिंचवड विधानसभेच्या 13 प्रभागांत आजपासून मैदानावर उतरून काम सुरू केले आहे, अशी माहिती आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी दिली.

Back to top button