

पुढारी ऑनलाईन डेस्क : २००७ मध्ये खेळवण्यात आलेला पहिल्या टी २० विश्वचषक भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आपल्या नावावर केला होता. आता टीम इंडियाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर युकेतील एक प्रॉडक्शन हाऊस वेबसिरीज बनवत आहे. या वेबसिरीजमध्ये भारताने पाकिस्तानचा कसा पराभव केला, हे पहायला मिळणार आहे. (T20 World Cup)
२०२२ च्या टी २० विश्वचषकात भारत सेमी फायनलमध्ये पोहचला होता. मात्र, सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारतावर १० गडी राखून विजय मिळवला. सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. आजवर भारतीय संघाला एकदाच टी २० विश्वचषक जिंकता आला आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या २००७ च्या पहिल्या टी २० विश्वचषकावर टीम इंडियाने आपले नाव कोरले होते. (T20 World Cup)
आता १५ वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना भारताचे विजयी क्षण पहायला मिळणार आहेत. टीम इंडियाने विश्वचषकात मिळवलेल्या विजयावर एक वेबसिरीज बनवली जात आहे. निर्मात्यांनी या वेबसिरीजच्या नावाबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, या वेबसिरीजमध्ये भारताने पाकिस्तानर कसा विजय मिळवला हे पहायला मिळणार आहे. (T20 World Cup)
युकेमधील वन वन सिक्स नेटवर्क द्वारे या वेबसिरीजची निर्मिती केली जात आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन आनंद कुमार यांच्याकडून केले जात आहे. आनंद कुमार यांनी यापूर्वी जिला गाजियाबाद आणि दिल्ली हाईट्स या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ही वेबसिरीज २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. (T20 World Cup)