Fadnavis on Rahul Gandhi : ‘सावरकर स्वातंत्र्याचे आधारस्तंभ’; इंदिरा गांधींनी केले होते कौतुक | पुढारी

Fadnavis on Rahul Gandhi : 'सावरकर स्वातंत्र्याचे आधारस्तंभ'; इंदिरा गांधींनी केले होते कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis on Rahul Gandhi) यांनी सावरकरांबाबत इंदिरा गांधींची मते वाचा, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांना दिले आहे. फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो. सावरकरांबाबत अशी वक्तव्ये करून तुम्ही तुमच्या व्होट बँकेची चिंता करत आहात का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले की, राहुलजी तुम्ही मला एका पत्रातील अंतिम ओळी वाचण्यास सांगितले होते. मी आज तुम्हाला एक दस्तऐवज वाचण्यासाठी देत आहे. भारताच्या माजी पंतप्रधान आणि तुमच्या आजी श्रीमती इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काय म्हटले होते? हे वाचून घ्या, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले आहे. (Fadnavis on Rahul Gandhi)

इंदिरा गांधींनी सावरकरांना स्वातंत्र्य आंदोलनाचा आधारस्तंभ आणि भारताच्या कायम लक्षात राहिल असा सुपूत्र म्हटले होते, अशा आशयाचे ट्वीट फडणवीस यांनी केले आहे. पुढे फडणवीस लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान असणारे शरद पवार सावरकरांबाबत काय म्हणतात हेही वाचा. तसेच माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंहराव यांनी सावरकर प्रखर राष्ट्रभक्त असल्याचे म्हटले होते.  (Fadnavis on Rahul Gandhi)

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई, कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सावरकरांबाबतच्या विचारांचाही उल्लेख केला. वरिल सर्वांनी सावरकर हे प्रखर देशभक्त आणि क्रांतिकारी असल्याचे म्हटले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धैर्य आणि देशभक्तीचे दुसरे नाव सावरकर असल्याचे म्हटले होते. वारंवार सावरकरांबाबत विधान करून तुम्ही तुमच्या व्होट बँकेची चिंता करत आहात का ? असा सवालही फडणवीस यांनी केला. (Fadnavis on Rahul Gandhi)

हेही वाचलंत का?

Back to top button