

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) भाग असलेला वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे (ishwar pandey) याने सोमवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मध्य प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची माहिती दिली. 2022 च्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर पांडेने निवृत्तीची घोषणा केली आहे.
33 वर्षीय ईश्वर पांडेने भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसला तरी, 2014 मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा तो त्या दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता. ईश्वर त्या दौऱ्यावर एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग होता. मात्र, संपूर्ण दौऱ्यात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील तो पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होता.
ईश्वरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 75 प्रथम श्रेणी, 58 लिस्ट ए आणि 71 टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 263, 63 आणि 68 विकेट घेतल्या आहेत. तो महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता. चेन्नईच्या IPL विजेतेपदाच्या संघाचा इश्वर भाग तोता. मात्र, गेल्या तीन मोसमापासून तो आयपीएलमध्ये खेळत नाहीये.
इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना ईश्वरचंद पांडेने लिहिलंय की, 'आज तो दिवस आला आहे आणि जड अंतःकरणाने मी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2007 मध्ये मी हा अद्भुत प्रवास सुरू केला आणि तेव्हापासून मी मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सामील होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. पण देशासाठी अधिक खेळण्याची संधी मिळू शकली नाही याचेही दु:ख आहे', अशी भावना त्याने व्यक्त केली.