T20 World Cup: भारतीय संघ निवडीच्या पाच मोठ्या गोष्टी जाणून घ्या.. | पुढारी

T20 World Cup: भारतीय संघ निवडीच्या पाच मोठ्या गोष्टी जाणून घ्या..

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 world cup Team India : आयसीसी टी 20 (ICC T20) विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात धक्कादायक बदल झाले नसले तरी 15 सदस्यीय मुख्य संघ आणि चार स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत काही रंजक गोष्टी आहेत. टीम इंडियासाठी चांगली बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे दोघेही आशिया कप 2022 मध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. दोघेही तंदुरुस्त झाले असून त्यांच्या पुनरागमनाने टीम इंडियाच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, संजू सॅमसन सारख्या आक्रमक फलंदाजाला ना मुख्य संघात ना स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत एन्ट्री देण्यात आली आहे.

टी 20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ (T20 world cup Team India)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

संघ निवडीच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी पाहूया :

बुमराह आणि हर्षल पटेलचे पुनरागमन

आशिया चषक स्पर्धेदरम्यान, टीम इंडियाला दर्जेदार वेगवान आक्रमणाची कमतरता भासली. स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत त्याचा नक्कीच फटका बसला. त्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊनही रोहित ब्रिगेडला पराभव पत्करावा लागला. अशातच आता बुमराह आणि हर्षल पटेल यांनी टी 20 वर्ल्ड कप संघात पुनरागमन केले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता नक्कीच कमी झाली असावी. बुमराह आणि हर्षल यांना टी 20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत हे दोघेही खेळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यांच्या माध्यमातून त्यांना चांगला सराव मिळेल यात शंका नाही आणि दोघेही अगामी मेगा स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार होतील. (T20 world cup Team India)

ऋषभ पंत थोडक्यात बचावला…

ऋषभ पंतने अलिकडच्या अनेक टी-20 सामन्यांमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. क्रिकेट तज्ज्ञांसह चाहतेही त्यांच्या खेळावर नाराज आहेत. पंतला भारतीय संघात स्थान देऊ नका, असे अनेकांनी मत व्यक्त केले होते. तसेच पंत ऐवजी संजू सॅमसनला घेण्याची अनेकांनी मागणी केली होती. या सगळ्यात पंतवर संघातून बाहेर पडण्याची टांगती तलवार निर्माण झाली, पण टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडताना निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा पंतवर विश्वास टाकत त्याला संघात स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान पंतला पुन्हा फॉर्म मिळवण्यावर भर द्यावा लागणार आहे. निवड समितीच्या बैठकीत पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाला घेण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे, कारण केएल राहुल विकेटकीपिंगही करू शकतो. अशा स्थितीत दोन यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश करणे थोडे कठीण वाटत होते. पण अखेर पंत आणि डीके हे दोघेही वर्ल्ड कप संघाचा भाग बनले आहेत.

शमीचे पुनरागमन पण स्टँडबायमध्ये…

मोहम्मद शमीच्या नावाचीही बरीच चर्चा झाली होती. तो मुख्य संघाचा भाग असेल असे वाटत होते, परंतु सध्या तो स्टँडबाय खेळाडूंपैकी एक आहे. शमीचा अनुभव टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियात उपयोगी पडू शकतो. तो संघाचा भाग नसला तरी त्याच्या उपस्थितीमुळे युवा वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते.

अश्विनने रवी बिश्नोईला टाकले मागे..

आर. अश्विन मुख्य संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याने युवा फिरकीपटू रवी बिश्नोईला मागे टाकले. बिश्नोई मात्र स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. बिश्नोईला संधी मिळाली नसली तरी तो बाहेर बसूनही संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा आहे. (T20 world cup Team India)

निवडकर्त्यांचा अर्शदीपवर विश्वास…

अर्शदीप सिंगने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले आहे. आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो अचून मारा करून स्वत:ला सर्व पातळ्यावर सिद्ध करत आहे. अर्शदीपला त्याच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळाले असे म्हणावे लागेल. तो T20 वर्ल्ड कप संघाचा एक भाग बनला आहे. दुरीरीकडे शॉर्ट बॉल खेळण्यात अपयशी ठरत असलेल्या श्रेयस अय्यरचा अडचणीत सापडला. त्याला मुख्य संघाचा भाग बनता आले नाही, पण त्याच्या नावाचा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (T20 world cup Team India)

Back to top button